कणकवली : बाजारपेठेतील झेंडा चौकात सुरेश तायशेटे यांच्या घराची कौले काढून अज्ञाताने घरात प्रवेश केला. झोपलेल्या तायशेटे दाम्पत्याला मारहाण करीत दहा हजारांची रोकड पळविली. यावेळी त्याने सुरेश तायशेटे यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेण्याचा प्रयत्नही केला. यावेळी चोरटा आणि तायशेटे यांच्यात झटापटही झाली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भरवस्तीत हा प्रकार घडला. सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या रात्र गस्तीला न जुमानता हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याच ठिकाणावरून काही दिवसांपूर्वी अज्ञाताने दुचाकी पळवून नेली होती. झेंडा चौकात सुरेश तायशेटे (वय ७५) पत्नी प्रतिभा (६५) यांच्यासह कौलारू घरात राहतात. शुक्रवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने घराच्या मागील बाजूची कौले काढून स्वयंपाकघरात प्रवेश केला. स्वयंपाकघराच्या बाजूलाच सुरेश तायशेटे झोपले होते, तर पुढच्या खोलीत प्रतिभा तायशेटे झोपल्या होत्या. चोरटा हॉलमध्ये लावलेल्या सुरेश तायशेटे यांच्या शर्टाच्या खिशातील पैसे चोरत असताना प्रतिभा तायशेटे यांना जाग आली. घरात कोणीतरी घुसल्याचे लक्षात येताच त्यांनी आपल्या पतीला हाक मारली आणि आरडाओरडा केला. चोरट्याने प्रतिभा तायशेटे यांचे तोंड दाबून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत मंगळसूत्र खाली पडले. प्रतिभा तायशेटे यांनी घराच्या बाहेर पडत आरडाओरड करत शेजाऱ्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने सुरेश तायशेटे यांना धक्काबुक्की करीत देवाच्या फळीसमोर ठेवलेले आठ हजार ५०० रुपये, प्रतिभा तायशेटे यांच्या पर्समधील आणि सुरेश तायशेटे यांच्या शर्टाच्या खिशातील मिळून एकूण १० हजार १०० रुपये चोरून मागील दरवाजातून पळ काढला. (प्रतिनिधी) श्वानपथक दाखल काही वेळाने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक सुनील मोरे, पोलिस हवालदार कृष्णा केसरकर, आदी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. ओरोस येथून श्वानपथक मागविण्यात आले. श्वानाने घराच्या मागील बाजूने स्टेट बॅँकेपर्यंत माग काढला. जागे झालेल्या नागरिकांनी चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटा सापडू शकला नाही. याप्रकरणी सुरेश तायशेटे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. उपनिरीक्षक संदीप देशमुख तपास करीत आहेत.
कणकवलीत भरवस्तीत चोरी
By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST