पुरळ : इळये येथील भाऊसाहेब लोकेगावकर हायस्कूलचे शिक्षक सुशील मणचेकर हे बेदम मारहाण करत असून काही विद्यार्थ्यांना कचऱ्याच्या पेटीजवळ जमिनीवर बसवून त्यांना तासनतास शिक्षा देत असल्याप्रकरणी गिर्ये ग्रामस्थांनी नुकतीच याबाबतची तक्रार गिर्ये हायस्कूलचे मुख्याध्यापक हेरवाडे यांच्याजवळ केली. त्या शिक्षकावर तत्काळ कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.गिर्ये हायस्कूलचे शिक्षक मणचेकर हे विद्यार्थ्यांना विनाकारण मारहाण करीत आहे. नुकतेच हायस्कूलमधील पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या खानाखाली जोरात थप्पड मारल्याने त्या विद्यार्थ्याच्या कानामधून रक्तही आले होते. या विद्यार्थ्याच्या वडिलांनी गावातील ५0 ते ६0 ग्रामस्थांना सांगून मुख्याध्यापक हेरवाडे यांच्याजवळ तक्रार केली आहे.मात्र, त्या शिक्षकाने झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली आहे. मणचेकर हे शिक्षक हिंसक प्रवृत्तीचे असून त्याने अनेक विद्यार्थ्यांना रक्त येईपर्यंत मारहाण केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांच्या वडिलांनी शाळेमध्ये या शिक्षकाच्या विरोधात तक्रारी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना त्याच्या वडिलांचे नाव घेवून मणचेकर शिक्षक हाक मारतात, असेही कृत्य हा शिक्षक करत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्याविरोधात शाळेत तक्रार केली अशा विद्यार्थ्यांना ते वाईट वागणूक देत आहेत. शाळेच्या बाहेर उभे करणे, कचरापेटी जवळ बसवणे अशी शिक्षा मणचेकर देत आहेत. यामुळे या शिक्षकावर तत्काळ कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
इळयेत शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना मारहाण
By admin | Updated: August 1, 2014 23:20 IST