कणकवली : मोदी शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारात सुरेश प्रभू यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. रेल्वे मंत्रीपद प्रभू यांना दिले जाण्याची शक्यता आहे. अभ्यासू आणि सालस व्यक्तिमत्त्व असलेल्या सुरेश प्रभूंच्या केंद्रातील वर्णीने सिंधुदुर्गवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. केंद्र आणि राज्यात भाजपा सरकारच्या माध्यमातून सुरेश प्रभू जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून मनोहर पर्रीकर, जे.पी. नड्डा, वीरेंद्र सिंह यांच्यासोबत सुरेश प्रभू यांची वर्णी लागली. सुरेश प्रभू हे पहिल्यापासून देश विदेश पातळीवर काम करत असल्याने मतदारसंघाशी संपर्क कमी असल्याची नाराजी व्यक्त होत होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही विनायक राऊत यांच्यासोबत सुरेश प्रभू यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, प्रभू यांच्या नावाला विरोध झाल्याने राऊत यांना उमेदवारी मिळाली. मात्र, देश विदेश पातळीवर कामाचा अनुभव असलेल्या सुरेश प्रभू यांचे महत्त्व ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट प्रभू यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. सिंधुदुर्गातील एकमेव आतापर्यंत केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागलेले सुरेश प्रभू हे एकमेव सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधी आहेत. यापूर्वी वाजपेयी शासनात विविध खात्यांचा कार्यभार प्रभू यांनी सांभाळला. यापूर्वी राजापूर आणि आताच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून १९९६ ते २००९ या काळात चार वेळा प्रभू खासदार म्हणून निवडून आले. रेल्वेचे प्रश्न मार्गी लागणार का? प्रभू यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपविला गेल्यास कोकण रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी आशा निर्माण झाली आहे. रेल्वेचे दुपदरीकरण, गाड्यांना सिंधुदुर्गातील थांबे मिळणे, स्थानकांवरील शेडस्, ओव्हरब्रिज आदी प्रश्नांवर मार्ग निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी) दैदीप्यमान कारकीर्द पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले सुरेश प्रभू इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंट आॅफ इंडियाचे सदस्य आहेत. वायपेयी सरकारमध्ये त्यांनी उद्योग, पर्यावरण आणि वन, खत आणि रसायन, ऊर्जा, अवजड उद्योग या खात्यांची मंत्रीपदे सांभाळली. विविध संसदीय समित्यांच्या अध्यक्षपदी, सदस्यपदी प्रभू यांनी काम केले आहे. वाजपेयी सरकारच्या महत्त्वाकांक्षी नद्याजोड प्रकल्प मोहिमेच्या अध्यक्षस्थानी प्रभूच होते. देशविदेशातील अनेक संस्थांच्या सल्लागारपदी, सदस्यपदी सुरेश प्रभू काम करतात. अलिकडेच वर्ल्ड बॅँक संसदेच्या सदस्यपदी निवडले गेले असून दक्षिण आशिया पाणी परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांचे नाव निर्देशित करण्यात आले आहे.
सुरेश प्रभूंच्या निवडीने आशा पल्लवित
By admin | Updated: November 9, 2014 23:39 IST