सावंतवाडी : दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळातील वाद गुरूवारी उफळल्यानंतर या नवीन कार्यकारिणी मंडळातील तीन सदस्यांनी शुक्रवारी अनपेक्षितरित्या माघार घेतल्याने मंडळात फूट पडली आहे. तर काँग्रेसनेही या विषयावर कडक भूमिका घेतानाच संस्थानासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, अशी भूमिका घेत सर्व पद्धतीची मदत केली जाईल, असे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले आहे.दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळातील वाद गुरूवारी अचानक उफाळून आला होता. जुन्या काही सदस्यांनी नवीन संचालक मंडळ स्थापन केले. तसेच राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या प्रकारानंतर सर्वच पक्षांसह शहरातील नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेतली आणि हा प्रकार हाणून पाडण्याचे ठरवले. अनेकांनी स्वत: भेटून राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांना पाठिंबा जाहीर केला.त्यानंतर शुक्रवारी नवीन संचालक मंडळ नेमण्यात आले होते. या संचालक मंडळातून भाजप तालुकाध्यक्ष मंदार कल्याणकर व शहराध्यक्ष अॅड. सिध्दार्थ भांबुरे, उपसभापती महेश सारंग यांनी या नियामक मंडळातून माघार घेतल्याचे तसे पत्रान्वये जाहीर केले आहे. त्यामुळे आता नवीन नियामक मंडळात कोणाला घेतात, यावर सर्व बाबी अवलंबून राहणार आहेत.तर दुसरीकडे काँॅग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी चांगल्या शिक्षण संस्थेत राजकारण आणू नका, लोकभावनेचा आदर करा, अशी भूमिका घेतली. नारायण राणे यांनी संस्थानच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना सारंग यांनी अशी भूमिका घेणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थानसाठी आम्ही रस्त्यावर उतरूच त्याशिवाय न्यायालयीन प्रकियेत मदत करू, असेही यावेळी सावंत यांनी जाहीर केले. यावेळी काँॅग्रेस नेते विकास सावंत, संदीप कुडतरकर, बाळा गावडे, संजू परब, संदीप सुकी, मंदार नार्वेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘दक्षिण रत्नागिरी’च्या नवीन मंडळात फूट
By admin | Updated: November 28, 2014 23:51 IST