दाभोळ : दाभोळ गावात सौरऊर्जा बॅटरी चोरीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, त्यापैकी दोघांना जामीनावर मुक्त करण्यात आले आहे. तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.दाभोळ ग्रामपंचायतीच्या सात सौरऊर्जा पथदीप बॅटऱ्या चोरीसंदर्भात सरपंच डॉ. आनंद गोंधळेकर यांनी, तर कोळथरे येथील तीन सौरऊर्जा पथदीप बॅटऱ्या चोरीसंदर्भात सरपंच अलंकार मयेकर यांनी दाभोळ सागरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधु शिंदे यांनी याप्रकरणी तिघांवर भादंविक ४११, ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, राहुल मनोहर वानरकर, सूरज अनिल तवसाळकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच वैभव शेखर तोडणकर याला विधी संघर्ष बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्याला रत्नागिरी येथील बाल न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला जामीन मंजूर झाला आहे. सरकारी मालमत्तेची सर्वांत मोठी व धाडसी चोरी म्हणून घटनेकडे पाहिले जात आहे. चोरी केलेल्या बॅटऱ्यांसंदर्भात दाभोळ पोलीस कसून शोध घेत असून, अनेक संशयितांवर पोलिसांची करडी नजर आहे. अनुप प्रवीण नरवणकर व शुभम मयेकर (पंचनदी) यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस स्थानकात दररोज हजेरी लावण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले आहे. या चोरी प्रकरणाकडे संपूर्ण दाभोळवासीयांचे लक्ष लागले आहे. पैशांसाठी असे प्रकार मोठ्या शहरांमध्ये घडत होते. मात्र, आता त्याची लागण दाभोळ, कोळथरेसारख्या गावात होत आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अशोक गायकवाड, विलास साळवी, अण्णा गोनी, पी. एल. चव्हाण अधिक तपास करत आहेत. (वार्ताहर)
सौरदीप बॅटरी चोरी, तिघे पोलीस कोठडीत
By admin | Updated: November 23, 2014 23:57 IST