वसई /पालघर : नव्या पालघर जिल्ह्यात झालेल्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत सहा मतदारसंघात सरासरी ६० टक्के विक्रमी मतदान अत्यंत शांततेत पार पडले. त्यापैकी बोईसरला सर्वाधिक ७२ टक्के, त्या खालोखाल पालघरला ६८ टक्के, वसईला ६० टक्के, विक्रमगड ५९ टक्के, डहाणू व नालासोपाऱ्याला प्रत्येकी ५७ टक्के असे मतदान झाले. वसईतील माजी आमदार व बविआचे सूत्रधार हितेंद्र ठाकूर विरुद्ध मावळते अपक्ष आणि शिवसेना पुरस्कृत आमदार विवेक पंडित व माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, माजी राज्यमंत्री व बविआच्या उमेदवार मनीषा निमकर, माजी राज्यमंत्री शंकर नम माजी आमदार कृष्णा घोडा, विष्णू सवरा, विलास तरे यांचेही भवितव्य या मतदानाद्वारे यंत्रात बदिंस्त झाले. सकाळी मतदानाचा ओघ चांगला होता. परंतु, नंतर तो काहीसा मंदावला आणि दुपारपासून ते संध्याकाळी ६ पर्यंत वाढत-वाढत गेला. नालासोपाऱ्यातील क्षितिज ठाकूर, शिरीष चव्हाण, तर डहाणूतील शंकर नम आणि विलास तरे आदी मान्यवरांचेही भवितव्य आज मतदान यंत्रांत बंदिस्त झाले आहे. शिवसेनेच्या माजी आमदार आणि राज्यमंत्री मनीषा निमकर या वेळी बविआकडून उभ्या आहेत, तर राष्ट्रवादीचे कृष्णा घोडा या वेळी शिवसेनेकडून नशीब आजमावित आहेत. राष्ट्रवादीचे शंकर नम या वेळी सेनेकडून डहाणूतून झुंज देत आहेत, तर वसईत विवेक पंडित यांनी अपक्ष राहणे पसंत केले आहे. डहाणूमध्ये रामजी वरठा यांचे पुत्र जगन्नाथ वरठा यांची पालघरमधील मनसेची उमेदवारी मतदारांना कितपत पसंत पडली, याचाही फैसला होणार आहे. विक्रमगडचे आमदार चिंतामण वनगा खासदार झाल्यामुळे या वेळी त्यांच्या जागी भिवंडी ग्रामीणमधले मावळते आमदार सवरा हे भाजपाकडून उमेदवार आहेत. त्यांना तेथील मतदार कितपत पसंती देतात, याचाही कौल या मतदानाद्वारे यंत्रांत सामावला गेला.
गट प्रकल्पाला बचतगटांचा अल्प प्रतिसाद
By admin | Updated: October 16, 2014 00:05 IST