कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर रामेश्वर प्लाझासमोर कनेडीहून कणकवलीकडे येणारी एसटी व वागदेच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायरमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नगराध्यक्षांसह सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास घडली.काही कामानिमित्त नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत आपल्या कुटुंबीयांसोबत स्वीफ्ट डिझायर (क्र.एमएच ११, एके-३५९५) मधून मुंबई येथे गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्या कणकवली येथे दाखल झाल्या. कारचालक अविनाश जानबा गावकर (वय ४७, रा. वागदे) याला त्याच्या घरी सोडण्यासाठी जात असताना रामेश्वर प्लाझासमोर एसटी व स्वीफ्ट डिझायरमध्ये धडक होऊन अपघात झाला.कनेडीवरून कणकवलीच्या दिशेने बालाजी सूर्यकांत मुंडे (वय २८) हे एसटी क्र. (एमएच २०, डी-८४२३) घेऊन येत होते. याचवेळी अविनाश गावकर खोत कुटुंबियांसह वागदेच्या दिशेने स्वीफ्ट डिझायर घेऊन निघाला होता. यावेळी दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामुळे झालेल्या अपघातात नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, त्यांचे पती यशवंत उर्फ बंडु खोत, मुलगी ऋता, रेखा, तसेच कारचालक अविनाश गावकर हे जखमी झाले. तसेच एसटी चालक बालाजी मुंडे हेही जखमी झाले आहेत. तर एसटीबरोबरच कारचेही नुकसान झाले आहे. हा अपघात अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही वाहनचालक तसेच नागरिकांनी तातडीने जखमींना येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील काही जखमींना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले तर काही जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबतची माहिती पोलीस स्थानकात एसटी चालक बालाजी मुंडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)
नगराध्यक्षांसह सहाजण जखमी
By admin | Updated: December 30, 2014 23:28 IST