सावंतवाडी : सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात फिरते विक्रेते येऊन बसतात. त्यामुळे जे कर देऊन व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतो. या फिरत्या विक्रेत्यांसह सतत लागणारे सेल याला परवानगी देण्यात येऊ नये, या मागणीसाठी सावंतवाडीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेऊन लक्ष वेधले. यावेळी साळगावकर यांनी यापुढे मंगळवार सोडून इतर दिवशी फिरत्या विक्रेत्यांना शहरात बसू दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले.यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, बाळ बोर्डेकर, आनंद नेवगी, गीतेश पोकळे, जगदीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.सावंतवाडीत फिरते विक्रेते मोठ्या प्रमाणात आहेत. ते दर दिवशी वेगवेगळ््या वस्तू घेऊन रस्त्यावर बसतात. त्यामुळे स्थानिक व्यापाºयांचा व्यवसाय होत नाही.
जे व्यापारी कर भरतात त्यांच्यावर हा अन्याय आहे. तर रस्त्यावर बसणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. या विरोधात सावंतवाडीतील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. आम्ही व्यवसाय कसा करायचा हे तुम्हीच सांगा, असे त्यांनी यावेळी सांगितले.त्यावर साळगावकर यांनी यापुढे मंगळवारच्या बाजारात येऊन जे उभाबाजारमध्ये व्यवसाय करतील त्यांच्यावर नगरपालिका कोणतेही निर्बंध आणू शकणार नाही. पण जर मंगळवारच्या व्यतिरिक्त कोण मुख्य बाजारात किंवा अन्य ठिकाणी फिरता व्यवसाय करीत असेल तर त्याच्यावर पालिका कारवाई करेल, असा इशारा दिला आहे.तसेच जे सेल रस्त्यावर लागतील त्याला आम्ही यापुढे परवानगी देणार नाही. पण बंदिस्त ठिकाणी सेल जर लागला तर त्याला पालिका काही करू शकणार नाही, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्यापाऱ्यांनी आम्ही या विरोधात जिल्हाधिकारी तसेच जीएसटी कौन्सिलकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी पालिकेत जमा झाले होते.