संदीप बोडवे
मालवण - मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची काही माती खचली आहे. सततच्या पावसामुळे नव्याने करण्यात आलेल्या जमिनीचा भराव खचल्यामुळे ही घटना घडली आहे. यामुळे पुतळ्यास कोणताही धोका नसून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तातडीने दुरुस्ती हाती घेतली आहे.
पुतळ्याला कोणताही धोका नाही
नव्याने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचां पुतळा पुढील १०० वर्ष टिकेल इतका मजबूत उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा चबुतरा आणि प्रत्यक्ष पुतळ्याच्या कामात कोणताही हलगर्जी झालेला नाही. पुतळ्याचा चबुतरा काँक्रीटचा असून त्याच्या भोवताली टाकलेली मातीचा भराव पावसाच्या पाण्यामुळे दबला गेला आहे. पुतळा उभारल्यानंतर हा पहिलाच पाऊस असून काही काळ हा भराव दबला जाणे हे नैसर्गिक असल्याचे बांधकाम अभ्यासकांनी सांगितले. यामुळे प्रत्यक्षात पुतळ्याचा कोणताही धोका उद्भवत नसल्याचेही ते म्हणाले.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर यापूर्वी शिवरायांचा ४० फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा पुतळा कोसळला असे म्हटले जात आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महायुती सरकारने गाजावाजात जुन्या पुतळ्याच्या जागेवरच नव्या पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार, थोड्या कालावधीत नवा पुतळा उभारण्यात आला. मे २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच या नव्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला लागून असलेली जमीन खचल्याचे दिसून आले आहे. या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरु झाल्या आहेत.
पावसामुळे मातीचा भराव दबला
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असलेल्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन काही प्रमाणात खचली असली, तरीही शिवरायांचा पुतळा सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान खचलेल्या भरावाची डागडुजी करण्याचे काम प्रशासनाने तातडीने हाती घेतले आहे. - अजीत पाटील, सहाय्यक अभियंता श्रेणी १, सार्वजनिक बांधकाम विभाग