चिपळूण : शिक्षण विभागाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वेतनबील आतापर्यंत सादर करुन घेतलेले नाहीत. तसेच अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करताना कोणत्याही प्रकारे संस्था चालकांना विचारात न घेता गोंधळांने व घाईगडबडीने काढलेले आदेश या व इतर दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांची सभा रिगल कॉलेज कोंढे, चिपळूण येथे घेण्यात आली. सदर सभेच्यावेळी चिपळूण तालुका शिक्षण संस्था संघ या संघाची स्थापना करण्यात आली व संघाचे अध्यक्ष म्हणून संजय शिर्के, अध्यक्ष रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे अशोक विचारे सेक्रेटरी सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे, अभय सहस्त्रबुध्दे अध्यक्ष भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ मेढे परशुराम, सुधाकर भागवत अध्यक्ष परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण, गंगाराम इदाते उपाध्यक्ष, परशुराम एज्युकेशन सोसायटी, चिपळूण, महेंद्र कदम अध्यक्ष नायशी, कळंबुशी, वडेरु पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, नायशी, अर्जून आयरे अध्यक्ष ग्रामविकास मंडळ, करंबवणे व शशिकांत दळवी अध्यक्ष जीवन शिक्षण प्रसारक मंडळ, पंचक्रोशी कोकरे यांची समिती सदस्य म्हणून निवड करयात आली. उपस्थित सर्व संस्था चालकांचे रिगल परिवारातर्फे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक श्री. शिर्के यांनी केले. सहस्त्रबुध्दे, इदाते सर, श्री. दळवी यांनी उपस्थित सर्व संस्था चालकांना संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजना यावर मोलाचे मार्गदर्शन केले. सभेला तालुक्यातील बावीस संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. संस्थांच्या अडचणी प्रकर्षाने मांडण्यासाठी तालुक्यातील सर्वच शिक्षण संस्था एकमताने शिर्के यांच्या पाठीशी उभ्या राहतील, असे यावेळी उपस्थितांनी नमूद केले. शिक्षणमंत्री विनाद तावडे यांना इदाते यांच्यामार्फत भेट देवून संस्थांच्या अडचणी मांडण्यात येतील, असे यावेळी ठरविण्यात आले. शिक्षण, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भरतीवरील निर्बंध माहे नोव्हेंबर २०१४ चे शालेय कर्मचाऱ्यांचे शिक्षण विभागातील पगारबीले सादर करुन न घेणे. अशा विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक, यांच्या वेळेनुसार भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे, तालुक्यातील अनुदानित, अनुदानित संसथा, इंग्रजी माध्यम, उर्दु माध्यमाच्या तसेच व्यावसायिक शिक्षण संस्थांचे चिपळूण तालुका शिक्षण संस्था संघ, चिपळूण या संघाचे नोंदणी अर्ज भरुन घेण्याचे ठरले व संस्थांच्या अडचणी लेखी स्वरुपात चार दिवसांत रिगल कॉलेज कोंढे, चिपळूण येथे आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीमुळे चिपळूण तालुक्यातील विविध शिक्षण संस्था चालक एका व्यासपिठावरून आपले प्रश्न मांडणार आहेत. (प्रतिनिधी)
शैक्षणिक प्रश्नांवर तोडग्याचा निर्णय
By admin | Updated: November 16, 2014 23:54 IST