सावंतवाडी : केरळ-मजेश्वरी येथे होणाऱ्या ६१ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कुमारी राज्य संघात सिंधुदुर्ग फेडरेशनची अष्टपैलू खेळाडू स्नेहा अनिल टिळवे हिची निवड झाली असून, ती या स्पर्धेसाठी रवाना झाली आहे. जून २०१४ दरम्यान बदलापूर-ठाणे येथे झालेल्या राज्य कुमारी गटनिवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्गच्या कुमारी संघाने लक्षवेधी खेळ करत उपांत्य फेरीत धडक दिली होती. स्नेहा ही सावंतवाडी तालुका कबड्डी असोसिएशनची व शिकार्जना महिला संघाची हुशार व गुणवान खेळाडू असून ती येथील आरपीडी हायस्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. कोलगावसारख्या ग्रामीण भागातून तिने घेतलेली ही भरारी नवोदितांना प्रेरणादायी आहे, असे उद्गार कार्याध्यक्ष शशी नेवगी यांनी काढले. दहा वर्षांच्या कालखंडानंतर स्नेहा हिची झालेली निवड महिला कबड्डीसाठी चैतन्यदायी आहे, अशा शब्दात पालकमंत्री व राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी कौतुक केले. तिच्या यशाबद्दल कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष बाबला पिंटो, अॅड. अजित गोगटे, दिलीप रावराणे, खजिनदार दिनेश चव्हाण यांनी अभिनंदन केले. स्रेहाला कबड्डी प्रशिक्षक शैलेश नाईक, मार्टिन आल्मेडा यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी स्नेहा टिळवेची निवड
By admin | Updated: January 2, 2015 21:41 IST