अनंत जाधव ल्ल सावंतवाडी सावंतवाडी विधानसभा शिवसेनेसाठी लकी ठरला आहे. कारण या मतदार संघातूनच नूतन खासदार विनायक राऊत यांच्या विजयाची घोडदौड सुरू झाली आहे आणि काँग्रेसचा पर्यायाने नारायण राणे यांचा राजकारणातील वारू रोखण्यात आमदार दीपक केसरकर यांना यश आले. त्यामुळे सावंतवाडी मतदार संघच राऊतांच्या विजयाचा किंगमेकरच्या भूमिकेत राहिला आहे. राऊतांचा विजय झाला असला तरी त्यांच्या विजयाचे खरे हिरो दीपक केसरकर ठरले आहेत आणि काँग्रेसला या मतदार संघासाठी नेतृत्व शोधण्याची वेळ आली आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघ म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यांचा विभाग आहे. हा मतदार संघ तसा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला असून मध्यंतरी शिवसेनेने यावर झेंडा रोवला होता. त्यानंतर या मतदार संघात राष्ट्रवादी काँॅग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादामुळे या मतदार संघात काय होणार, याचीच उत्सुकता कायम होती. या मतदारसंघाचा अभ्यास केला असता राष्ट्रवादीचा आमदार आणि सावंतवाडी नगरपालिका राष्ट्रवादीकडे व दोडामार्ग पंचायत समिती वगळता मतदारसंघातील सर्व सत्ताकेंद्रे ही काँग्रेसकडे होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँॅग्रेस व काँग्रेस एकत्रपणे लढले. या निवडणुकीत ६८ हजार एवढी मते आमदार दीपक केसरकर यांना पडली. शिवसेनेच्या उमेदवाराला ४५ हजार तर अपक्ष उमेदवार प्रवीण भोसले यांना १८ हजार मते पडली होती. पण या निवडणुकीत केसरकरांना पडलेली मते ही धनुष्यबाणाच्या पारड्यात टाकण्यात यश मिळविले. तसेच आपल्यापेक्षा आणखी २० हजार मतेही त्यांना जास्त मिळाली आणि काँग्रेसची गाडी फक्त ४७ हजारावर येऊन थांबली. शिवसेनेला या मतदारसंघात ८८ हजार मते मिळाली आहेत. या मतदार संघातील सर्वाधिक ४१ हजारांचे मताधिक्य महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना मिळाले आहे. या मताधिक्यावर आमदार दीपक केसरकर यांची छाप उमटलेली दिसत आहे. केसरकर यांनी दहशतवादाविरोधाचा मुद्दा पकडत उघडपणे धनुष्यबाण हाती घेतला होता. याचा फटका काँग्रेसच्या उमेदवारास बसला त्याशिवाय काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी असूनही त्यांना त्याचा योग्य वापर करता आलेला नाही. कारण या मतदार संघात मोदी लाटेबरोबरच काँग्रेसविरोधात मोठी नाराजी दिसून आली. कळणे मायनिंग असो अगर साटेली मायनिंग, प्रकल्पग्रस्तांना मिळणार्या अपुर्या सुविधा, त्यांच्या समस्या, जिल्ह्यातील अनेक बंद झालेले प्रकल्प आलेली बेकारीची कुºहाड तसेच काँग्रेसकडून सत्तेच्या माध्यमातून गावागावात कार्यकर्त्यांकडून होणारी अरेरावी याचाही परिणाम या निकालावर झाल्याचे दिसून आला आहे. या निवडणुकीत सावंतवाडी मतदार संघ हा राऊतांना जास्त मताधिक्क देत किंगमेकरच्या भूमिकेत दिसून आला आहे. या मताधिक्यामुळेच काँग्रेसचा रत्नागिरी-सिंधुदुर्गातील वारू शिवसेनेने रोखला आहे. यावेळी शिवसेनेला मिळालेले मताधिक्य हे शहरी भागातही मोठे आहे. त्यामुळे यावेळी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागही शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या मतदानाची आकडेवारी ही लाखांच्या घरात जाऊन पोहोचल्याने काँग्रेसला भविष्यात पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीच्या निमित्ताने सावंतवाडीत मतदारसंघात खंबीर नेतृत्त्वाची गरज भासली आहे. सध्याची काँग्रेस मोठ्या प्रमाणात गटातटात विभागली गेल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास त्यांना या मतदारसंघासाठी खंबीर नेतृत्व उभे करावेच लागेल. अन्यथा भविष्यात आमदार दीपक केसरकर यांना रोखणे काँग्रेसला अवघड जाणार आहे. इतर ठिकाणापेक्षा इथे राऊत यांना मताधिक्य अधिक असतानाही हा केवळ मोदी इफेक्ट अशीच भूमिका काँग्रेसने ठेवली तर ती घोडचूक ठरेल.
‘किंगमेकर’च्या भूमिकेत सावंतवाडीच
By admin | Updated: May 18, 2014 00:30 IST