सिंधुदुर्गनगरी : सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण दर हजारी मुलांमागे ९६० एवढे आहे. ही बाब भविष्यात चिंताजनक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात ‘लेक वाचवा’ अभियान अधिक व्यापकतेने राबविणार असल्याची माहिती नूतन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.सुरक्षित मातृत्व दिन, जागतिक लोकसंख्या दिन व अतिसार नियंत्रण पंधरवडा याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. एम. सोडल, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्यचे प्रकल्प अधिकारी संतोष सावंत उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्त्री व पुरुषांची सापेक्षता महाराष्ट्राच्या मानाने खूप चांगली आहे. दर हजारी पुरुषांमागे १०३७ असे स्त्रियांचे प्रमाण आहे. असे सांगून डॉ. साळे म्हणाले की, सिंधुदुर्गातील लिंग गुणोत्तरांचे हे प्रमाण चांगले असताना आता ० ते ६ वयोगटातील लिंगदर मात्र दर हजारी मुलांमागे ९६० मुली आहेत. ही बाब भविष्यात निश्चितच चिंताजनक आहे. त्यामुळे याचा गंभीरपणे विचार करून ‘लेक वाचवा’ अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.सिंधुदुर्गात माता मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. सन २०१४-१५ मध्ये एका मातेचा मृत्यू झाला आहे. तरीही जास्तीत जास्त बाळंतपणही शासकीय रुग्णालयात व्हावी यासाठी दक्षता घेतली जाणार आहे. त्याचबरोबर नवजात अर्भकाला मातेचे स्तनपान तातडीने मिळावे यासाठी स्तनपानाची व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक सरकारी दवाखान्यात तसेच एस. टी. स्थानके, रेल्वे स्टेशनवर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येतील. या कक्षांमध्ये महिलेला आपल्या बाळाला सन्मानाने व गर्दीपासून बाजूला सुरक्षित वातावरणात स्तनपान करता येईल.डॉ. साळे म्हणाले, जिल्ह्याचे कुटुंब नियोजनाचे काम (उद्दिष्ट्य) ८६ टक्के आहे. ते यावर्षी ९० करण्याचा प्रयत्न आहे. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांमध्ये पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया व्हाव्यात म्हणून सर्व आरोग्य सेवकांना प्रत्येक एक लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.लोकसंख्या स्थिरतेच्या दृष्टीनेही सिंधुदुर्गाची परिस्थिती चांगली आहे. किंबहुना सिंधुदुर्गची लोकसंख्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. तरीही दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दांपत्याला व एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या दांपत्याला सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत बचत सर्टीफिकेट व रोख रक्कम देण्यात येणार आहे. ही योजना अनुसूचित जाती व जमातीसाठी आहे. या योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. साळे यांनी यावेळी सांगितले.अतिसाराने मृत्यू होण्याचे प्रमाण सिंधुदुर्गात गेल्या ८ ते १० वर्षात नाही. मात्र अतिसार होऊ नये म्हणून ओ. आर. एच. चे वाटप, विहिरींमध्ये टीसीएल टाकणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. केरळ राज्यातील आरोग्यविषयक मापकांना आदर्श मानले जाते. सिंधुदुर्गातही आरोग्यविषयक जनजागृती चांगली आहे व लवकरच केरळप्रमाणे येथील मापके होतील असा विश्वासही डॉ. साळे यांनी यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)
‘लेक वाचवा’ अभियान राबविणार
By admin | Updated: July 10, 2015 22:34 IST