शिरगांव : देवगड नांदगांव मार्गावर शिरगांव धोपटेवाडी येथील अवघड वळणावर देवगड आगाराच्या कुंभवडे देवगड या एस. टी. बसचे पुढील पाटे तुटल्याने एस. टी. बस अपघातग्रस्त होऊन रस्त्याच्या बाजूला कलंडली. अपघातात शिरगांव महाविद्यालयातील चार विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. ही घटना शनिवारी दुपारी १२.३० वाजता घडली. याबाबत अधिक वृत्त असे की, देवगड आगाराची कुंभवडे-देवगड ही एस. टी. बस (क्र. एम. एच. १२, ईएफ-६३५२) घेऊन चालक सुहास शेडगे हे देवगडला जात असताना शिरगांव धोपटेवाडी येथील अवघड वळणावर एस. टी. च्या चालकाच्या पुढील बाजूचे तीन पाटे अचानक तुटल्यामुळे वळणावर एस. टी. बस रस्त्याच्या बाहेर ओढली गेली. केवळ चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्यामुळे शिरगांव येथील शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी घरी जाण्यासाठी कुंभवडे-देवगड गाडीने प्रवास करीत होते. अपघातग्रस्त गाडीत ७० ते ८० प्रवाशी होते. यापैकी शिरगांव महाविद्यालयात बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या निकिता प्रकाश पडेलकर (वय १८, रा. वरेरी), ज्योती विश्वनाथ मेस्त्री (वय १८, रा. चांदोशी), संपदा एकनाथ राणे (वय १८, रा. टेंबवली), रविना संतोष कानकेकर (वय १८, रा. तळेबाजार) या विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. त्यांना शिरगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वाय. एस. चव्हाण यांनी उपचार केले. त्यानंतर जखमींना अधिक उपचारासाठी कणकवली येथील रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच रिक्षा चालक-मालक संघ शिरगांवचे अध्यक्ष संतोष जंगले, संदीप चव्हाण, सदाशिव चव्हाण, शरद लाड, दिलीप राणे, राजे ग्रुपचे अध्यक्ष हेमंत देसाई, सरपंच अमित साटम, पंचायत समिती सदस्य संतोष किंजवडेकर यांनी घटनास्थळी जाऊन जखमी प्रवाशांना मदत केली. प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची माजी उपसभापती अमित साळगावकर, पंचायत समिती सदस्य रवींद्र जोगल, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अर्जुन चव्हाण, शिरगांव हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. लक्ष्मण गोडसे, सहाय्यक शिक्षक सखाराम मुळे यांनी विचारपूस केली. या अपघाताची नोंद देवगड पोलीस ठाण्यात झाली असून शिरगांव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वरवडेकर अधिक तपास करीत आहेत. अपघातस्थळी एस. टी. चे अधिकारी अपघात झाल्यानंतर दोन तास फिरकलेच नसल्याने जखमींचे नातेवाईक तसेच प्रवाशांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. सुरक्षित प्रवास म्हणून एस.टी. महामंडळातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून त्याप्रमाणात प्रवाशांना सेवा मिळत नाही. (प्रतिनिधी)
एस. टी. बस अपघात विद्यार्थिनी जखमी
By admin | Updated: July 26, 2015 00:00 IST