सावंतवाडी : उडेली येथे केरळीयनांनी स्थानिकांशी दादागिरी करून केलेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा. अन्यथा मनसे गप्प बसणार नाही. सत्ताधारी पक्षाचा एक नेता केरळीयनांची पाठराखण करीत असून तोच पोलिसांवर दबाव आणत आहे, असा आरोप करत आम्ही यासाठी आंदोलन करणार असल्याचेही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते. यावेळी मनसे शहराध्यक्ष सागर कांदळगावकर, महेश सावंत, भारती रावराणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, मनसेचे श्रावणमास अभियान संपले असून, अनेक ठिकाणी आम्ही शहराध्यक्ष तसेच गटअध्यक्ष, बूथ अध्यक्ष यांच्या नेमणुका केल्या आहेत. उडेली प्रकरणी मनसे आता नव्याने आंदोलन हाती घेणार आहे. सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांसह ग्रामीण भागातील स्थानिकांवर अन्याय केला आहे. हा अन्याय होऊ देणार नाही. केरळीयनांनी कुठेकुठे जमिनी घेतल्या आहेत, त्यांचे व्यवहार कुणाच्या आशीर्वादाने झाले आहेत, याचीही चौकशी झाली पाहिजे. उडेलीतील घटनेनंतर सत्ताधारी पक्षाचा एक नेता बांदा पोलिसांवर दबाव आणू पाहत होता. तसेच तो राजकीय पक्षावरही दबाव आणत होता. असा प्रकार होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. उडेली प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे. जिल्ह्यात जे केरळीयन जमिनी घेऊन राहत आहेत, त्यांच्या नोंदी कुठच्या पोलीस ठाण्यात किती आहेत, याची माहिती प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी माजी आमदार उपरकर यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
केरळीयनांना सत्ताधारी नेता पाठिशी घालतो
By admin | Updated: August 12, 2014 23:13 IST