आंबोली : आंबोली येथील रस्त्यांची अवस्था बिकट झालेली असतानाच हिरण्यकेशी येथील एका वळणावरील रस्ता अधुनमधून पडत असलेल्या पावसामुळे खचला असल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक ठरु शकतो. याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी होत आहे.हिरण्यकेशी हे पर्यटनस्थळ असून याठिकाणी पर्यटनासाठी पर्यटकांची वर्दळ नेहमी असते. आंबोलीकडे येणाऱ्या रस्त्यांची काहीशी बिकट अवस्था झाली आहे. मात्र, तात्पुरती डागडुजी करुन संबंधित विभागाने कामचलावू भूमिका घेतल्याने अद्यापतरी खड्ड्यांच्या साम्राज्यावर मात केली आहे. मात्र, हिरण्यकेशीकडे जाणाऱ्या एका धोकादायक वळणावर पार्कींगजवळील जागेच्यानजिकचा रस्ता पावसामुळे खचला आहे. यामुळे सद्यस्थितीत वाहतुकीस मोठा धोका नसला तरीही या ठिकाणी संरक्षक भिंत न बांधली गेल्यास रस्त्याचा आणखीही भाग कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंदही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावर्षीच तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावर कोसळलेल्या ठिकाणी संरक्षक भिंत आवश्यक असतानाही बांधण्यात आली नाही. यामुळे हा रस्ता खचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या रस्त्यावरील साईडपट्टीचे कामही व्यवस्थित करण्यात आले नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. रस्त्याच्या चुकीच्या केल्या गेलेल्या कामांमुळे आंबोली हिरण्यकेशी येथील वाहतूक बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
हिरण्यकेशीकडे जाणारा रस्ता खचला
By admin | Updated: August 22, 2014 22:07 IST