गुहागर : गुहागर तालुका पत्रकार संघ आयोजित शासकीय कर्मचारी व पत्रकार यांच्या क्रिकेट स्पर्धेत गुहागर पंचायत समितीचा एकतर्फी पराभव करत महसूल - पोलीस संघाने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धा नुकत्याच गुहागर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. गुहागर पंचायत समितीने गुहागर तालुका पत्रकार संघावर, तर महसूल पोलीस संघाने गुहागर नगरपंचायत संघावर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महसूल - पोलीस संघाच्या योगेश शेटे, विनित चौधरी यांनी फटकेबाजी करत सहा षटकांमध्ये ८० धावांच्या पल्ला गाठला. गुहागर पंचायत समितीकडून शामू साळवी याने एकाकी लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि गुहागर पंचायत समितीच्या संघाला एकतर्फी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेमधून उत्कृष्ट फलंदाज योगेश शेटे (महसूल -पोलीस), उत्कृष्ट गोलंदाज विकास चाफेरकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकास मालप, शिस्तबद्ध खेळाडू संतोष वरंडे आदींची निवड करण्यात आली.संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून तोडणकर, कल्पेश बागकर, तर गुणलेखक म्हणून अमोल गोयथळे यांनी काम पाहिले. बक्षीस समारंभावेळी व्यासपीठावर तहसीलदार वैशाली पाटील, पोलीसपाटील विनित चौधरी, गटविकास अधिकारी बापू साठे, सत्यवान घाडे उपस्थित होते. समालोचन नीलेश गोयथळे यांनी केले. (प्रतिनिधी)गुहागर तालुका पत्रकार संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्या महसूल पोलीस संघाला तहसीलदार वैशाली पाटील यांच्याहस्ते गौरवण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विनित चौधरी व सत्यवान घाडे उपस्थित होते.
तालुका क्रिकेट स्पर्धेत महसूल-पोलीस संघ अजिंक्य
By admin | Updated: January 29, 2015 00:14 IST