मालवण : एप्रिल महिन्यात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. एप्रिल हिटचे चटके सोसण्यापलीकडचे असले तरी पर्यटकांनी मात्र उन्हाळी सुटीसाठी सिंधुदुर्गला पसंती दिली आहे. २२ एप्रिलपासून सुरु होत असलेला किल्ले सिंधुदुर्गचा ३५० वा वर्धापन दिन आणि उन्हाळी सुटी पडल्याने अनेक पर्यटक व चाकरमानी यांनी कोकणच्या पर्यटनाचा बेत आखला आहे. पर्यटकांना सिंधुदुर्गातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणेच मालवणचे विशेष आकर्षण असल्याने येत्या महिनाभरात पर्यटकांची रेलचेल असणार आहे. महिनाभर मालवण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून जाणार आहे. मालवणला दरवर्षी तीन ते चार लाख पर्यटक भेट देतात. येथे असणारे मनमोहक समुद्र्र किनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. किल्ले सिंधुदुर्ग आणि सागरी विश्व न्याहाळण्यासाठी असलेला स्कुबा डायव्हिंग हे पर्यटकांचे खास आकर्षणाचे हॉटस्पॉट बनत चालले आहे. उन्हाळी हंगामासाठी पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत. याआधी दिवाळी तसेच नववर्ष स्वागत पर्यटन हंगामाला राज्यभरासह देशी-विदेशी पर्यटकांनी मालवण, तारकर्ली, देवबागला सर्वाधिक पसंती दिली होती. २२ एप्रिलपासून सुरु होणारा किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन आणि शाळांना पडलेली उन्हाळी सुटीमुळे मे महिना अखेरीपर्यंत पर्यटकांची वर्दळ राहणार असल्याचे पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी आगाऊ बुकिंगही सुरु आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातही विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.मालवण समुद्रात जैवविविधतेचे व्यापक विश्व लपलेले आहे. त्यामुळे येथे येणारा पर्यटक किल्ले सिंधुदुर्ग दर्शनाबरोबरच व्यापक विश्व न्याहाळण्याचे मोठे आकर्षण आहे. सागरी पर्यटनाचा आनंद मनमोकळेपणे लुटण्यासाठी स्कुबा डायव्हिंग तसेच स्नॉर्कलिंग आदी सागरी क्रीडा प्रकार पर्याय उपलब्ध आहेत. मालवणसह तारकर्ली, वायरी, देवबाग याठिकाणीही जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्याने या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते. यावर्षी किल्ले सिंधुदुर्गचा वर्धापन दिन सोहळा होत असल्याने पर्यटक, शिवप्रेमी व चाकरमानी असा त्रिवेणी संगमही अनुभवता येणार आहे. (प्रतिनिधी)येवा मालवण आपलाच आसापर्यटनासाठी ‘फ्री’ हिट आवश्यक : उन्हाळी सुटीत पर्यटकांची वाढग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात मोठे बदल होत आहेत. एकीकडे सर्वत्र हवामानात कमाल सरासरीपेक्षा वाढ झाल्याने उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. पर्यटकांना कोकणाकडे पाहताना मुक्तहस्ते डुंबण्यासाठी समुद्र, नदी किनाऱ्याकाठी यावेसे वाटते. महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत कोकण किनारपट्टीत थंडाव्याची लाट असल्याने सर्वाधिक पसंती कोकणला मिळते. हवामानातील उष्णतेचा पारा असह्य चटके देणारा असला तरी पर्यटन वाढीसाठी फ्री हिट मानली जात आहे, असेही पर्यटन व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत चाकरमान्यांसह आता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आदी भागातून पर्यटक उन्हाळी सुटीत मालवणात येत आहेत. त्यांच्याकडे दुष्काळजन्य स्थिती असल्याने ते शक्यतो पर्यटनासाठी बाहेर पडतात. इतर ठिकाणांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विपुल मालवणी मेवा मिळत असल्याने सिंधुदुर्गला अधिक पसंती देतात. मालवणला ऐतिहासिक किल्ला तसेच जलक्रीडा प्रकार यामुळे मालवणात पर्यटकांचा नेहमीच उच्चांक असतो. कोकणी मेव्यालाही अधिक मागणी असते. किनारपट्टी भागात थंडावा असल्याने पर्यटक सिंधुदुर्गवारीसाठी येतात. १५ जून पर्यंत पर्यटकांची वर्दळ सुरु राहणार आहे. वाढत्या उष्णतेचा कोणताही परिणाम पर्यटनावर होणार नाही, असे पर्यटन व्यावसायिक नितीन वाळके यांनी सांगितले.
मालवणात पर्यटकांची विक्रमी वर्दळ
By admin | Updated: April 20, 2016 01:13 IST