सावंतवाडी : बाळासाहेबांना नारायण राणे यांनी दु:ख दिले. त्यांच्या स्वप्नातील कोकण साकार करूया. तसेच मला विकास हवा झुंडशाही नको. मी कधीही दहशतवादाशी तडजोड करणार नाही. यापुढे राणेंना सावंतवाडीतील जनता पालकमंत्रिपदावरून खाली खेचेल, असे सांगत राणेंनी दिलेला राजीनामा पुत्रप्रेमासाठी दिला आहे, अशी जोरदार टीका आमदार दीपक केसरकर यांनी केली.ते सावंतवाडीतील वैश्यभवनमध्ये आयोजित समर्थकांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, सुरेश दळवी, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सुकन्या नरसुले, अनारोजीन लोबो, राजन पोकळे, आदी उपस्थित होते.आमदार केसरकर म्हणाले, मी माझ्या वाढदिवसाला ‘मातोश्री’वर गेलो. तेव्हा तेथील वातावरण बघून मी भारावून गेलो. अनेकांनी मला आशीर्वाद दिले. यावेळी अनेकांची तळमळ ही शिवसेना प्रमुखांच्या मनातील कोकणची होती. ती तळमळ आपण साकार करूया, असे सांगत आता मी निर्णय घेतला आहे. माझ्या निर्णयाबरोबर अनेकजण जोडले गेले आहेत. त्यांची कधीही फसवणूक मी करणार नाही. इको-सेन्सिटिव्ह जिल्हा झाल्यास राजीनामा देईन, अशी वल्गना नारायण राणे यांनी केली होती. तेव्हा त्यांनी राजीनामा दिला नाही. मग आताच का राजीनामा दिला. हा राजीनामा निव्वळ पदासाठी आणि दोन मुलांच्या पुढील भविष्यासाठी दिला आहे. त्यांना मुलांचे भवितव्य दिसत आहे. माजी आमदार शंकर कांबळी यांनी काँॅग्रेसवर जोरदार टीका केली आता थांबणार नाही तर काम करणार, असे सांगत राणेंवर जोरदार टीका केली. यावेळी माजी नगराध्यक्ष अनारोजीन लोबो, नगराध्यक्ष बबन साळगावकर आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश परब यांनी केले. (प्रतिनिधी)
राणेंचा राजीनामा पुत्रप्रेमापोटी
By admin | Updated: July 28, 2014 23:27 IST