रत्नागिरी : कोकणासाठी निधी, प्रकल्प खेचून आणण्याची ताकद केवळ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास कोकणासह राज्याचेही नुकसान होणार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काम आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून प्रामाणिकपणे करण्यात आले आहे. ज्यांनी काम केलेले नाही ते आता शिवसेनेत गेले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणे यांनी कोकणच्या विकासाला न्याय देण्यासाठी चांगली भूमिका घेतली. कोकणच्या विकासात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. काँग्रेस आघाडीमध्ये त्यांच्यासारख्या नेत्याची कोकणासाठी गरज आहे. निधी आणि प्रकल्प खेचून आणण्याची त्यांच्यामध्येच ताकद असल्याचेही पालकमंत्र्यांनी मान्य केले.रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत चाललेल्या राजकारणावर भाजपाच्या नगरसेवकांनी वेगळ्या गटाची स्थापना करुन बंडखोरी केली आहे. त्यांनी भाजपाच्या नेत्यावरच अविश्वास दाखवून दिला आहे. तसेच निर्णय क्षमता नसलेले नगराध्यक्ष अशोक मयेकर त्यांना नको आहेत, असे भाजपाच्याच नगरसेवकांनी जाहीर केले आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक २४ जुलै रोजी सभागृहातच आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगितले. (शहर वार्ताहर)
राणेंनी राजीनामा दिल्यास नुकसान : सामंत
By admin | Updated: July 20, 2014 22:45 IST