राजापूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा व लखलखता इतिहास मागील अनेक वर्षे आपल्या लेखणीतून मांडणारे व जाणता राजा या नाट्यकृतीतून शिवशाही सादर करणारे शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान ९ नोव्हेंबरला राजापुरात आयोजित करण्यात आले.राजापुरातील मित्रमेळा संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, ९ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजता राजापूर हायस्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या विविध स्वारीनिमित्त राजापूर वा त्यालगत असलेल्या प्रदेशात प्रवेश केल्याचे इतिहास सांगतो. राजापूरची वखार ही स्वराज्यासाठी लुटत ब्रिटिशांची दाणादाण उडवली होती. त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील राजापूरचे योगदान यावर ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. इतिहासाचा लेखाजोखा पुरंदरे हे आपल्या वाणीतून ते सादर करणार आहेत. यापूर्वी इतिहास संशोधनासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अनेक वेळा राजापुरात येऊन गेले आहेत. मात्र, शिवचरित्रावर त्यांचे प्रथमच व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, ते विनामूल्य स्वरुपात आहे. याबाबत मित्रमेळाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करुन सविस्तर माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)राजापूरला ऐतिहासिक वारसा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे ९४व्या वर्षी या कार्यक्रमासाठी येत आहेत. हा कार्यक्रम अधिकाधिक रसिकांना ऐकता यावा, यासाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. यासाठी सुमारे २००० क्षमतेची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांसाठी या वेळेत एस. टी. सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही मित्रमेळा, राजापूर प्रयत्नशील असल्याचे रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
राजापूरला ९ रोजी पुरंदरेंचे व्याख्यान
By admin | Updated: November 4, 2014 22:40 IST