म्हापण : सध्या सुरू असलेल्या पारंपरिक मच्छिमार व मिनी पर्ससीनधारक मच्छिमार यांच्यातील वाढत चाललेल्या वादासंदर्भात निवती येथील पारंपरिक मिनी पर्ससीनधारक संघटनेचे अध्यक्ष अशोक सारंग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ज्यांनी पर्ससीननेट जाळण्याची भाषा केली आहे तसेच देवगड, मालवण किनाऱ्यावर दिसलेल्या संशयास्पद जहाजामागे निवती कनेक्शन असल्याचा जो संशय व्यक्त केला आहे त्या विधानाचा संघटनेच्यावतीने निषेध केला आहे. निवती येथे आलेल्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव घालण्यात आला. त्याचप्रमाणे मालवण येथील पारंपरिक मच्छिमार नेत्यांनी मंगळवारी जिल्हा मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांना मालवण कार्यालयात घेराव घालून निवती समुद्रात मिनी पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचा आरोप केला आहे तो फेटाळून लावण्यात आला. जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालय मालवण येथे असल्याने तेथील पारंपरिक मच्छिमार संघटनेच्या नेत्यांच्या दबावाखाली काम करते त्यामुळे ते जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावे. आमच्या मिनी पर्ससीनधारक मच्छिमारांचे पर्ससीन जाळे हे पारंपरिक रापण पद्धतीचे आहे. त्यामुळे पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होत नाही किंवा समुद्रतळ सुद्धा ओरबाडला जात नाही. पारंपरिक मासेमारीसाठी ज्या होड्या वापरल्या जातात त्याच होड्यांनी पर्ससीन मासेमारी केली जाते. मासेमारीसाठी स्वत: मालकच समुद्रात जातो व अन्य खलाशांना समान वाटणी दिली जाते. पारंपरिक मच्छिमारी व पर्ससीन मच्छिमारी यांची व्याख्या शासनाने स्पष्ट करावी. एक भारतीय म्हणून भारतातील इतर राज्यात मासेमारीचे जे स्वातंत्र्य आहे ते येथील मच्छिमारांना मिळावे व मच्छिमारांच्या मतानुसार त्या त्या गावातील लोकांना मासेमारीसाठी स्वातंत्र्य द्यावे. जोपर्यंत पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससीन मच्छिमार यांची व्याख्या कायद्यात येत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या धंद्यावर बंदी आणू नये, असे मिनी पर्ससीनधारक संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. इतिहास काळापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवती बंदराची बारमाही बंदर म्हणून नोंद आहे. त्यामुळे आम्हाला मासेमारी बंदीची मात्रा लागू होत नाही. ज्या पक्षांंची राष्ट्रीय मान्यता काढून घेण्यात आली आहे व ज्या पक्षाला जनाधार नाही त्या पक्षातील नेत्यांनी मिनी पर्ससीनधारकांना विरोध करून कलह निर्माण करू नये. आमचा मच्छिमारी हाच व्यवसाय असल्याने आम्ही आमची पर्ससीनने मच्छिमारी यापुढेही सुरू ठेवणार आहोत. आमच्या व आमच्या कुटुंबांच्या भवितव्याचा विचार करून आमच्या मच्छिमारांवर कुणाच्या सांगण्याने किंवा आकसाने कारवाई करू नये. आपण आम्हा मच्छिमारांना सहकार्य केल्यास आमचीही सहकार्याची भावना राहील असे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पर्ससीननेटधारकांकडून ‘त्या’ वक्तव्यांचा निषेध
By admin | Updated: July 16, 2015 00:36 IST