मंडणगड : आमदार संजय कदम यांनी बुधवारी (दि. २६) मंडणगड पंचायत समितीत घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत सभेच्या समारोपात सध्या प्रकृती अस्वास्थ्याने रुग्णालयात असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए़ आऱ अंतुले हे आपल्यात राहिले नसल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांच्या मृत आत्म्याला सभागृहाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. वास्तवात तसे काही घडल्याचे कोणतेही वृत्त नसल्याने आमदारांच्या या कृत्याचे विरोधी पक्षाकडून तालुक्यात पडसाद उमटले. मंडणगड तालुका शिवसेनेतर्फे पोलिसांना निवेदन देऊन कदम यांच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना तालुका शाखेच्यावतीने कदम यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आज सायंकाळी ४ वाजता येथील मुख्य चौकात शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, शहर प्रमुख विनोद जाधव, विभागप्रमुख प्रताप घोसाळकर, भाविसे तालुकाधिकारी मंगेश दळवी, शिरगावचे उपसरपंच इरफान बुरोंडकर, संतोष पार्टे, नितीन पवार, जितेंद्र साळवी या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे, मंडणगड व तहसीलदार कविता जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सभापती वैशाली चोरगे, उपसभापती आदेश केणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांच्या सह्या आहेत, तर समाजकल्याण सभापती शीतल जाधव यांचे नाव आहे. यासंदर्भात मंडणगड शिवसेना तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर यांनी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात काँग्रेस पक्षाकडून विरोधात अथवा स्पष्टीकरणात्मक प्रतिक्रिया अपेक्षित असताना पार्टीकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आलेली नाही़ (प्रतिनिधी)
शिवसेनेकडून कदम यांचा निषेध
By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST