वाटूळ : २०१४-१५ शैक्षणिक वर्षाची संचमान्यता सादर केल्याशिवाय कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे सप्टेंबरचे वेतन काढू नये, या शिक्षण आयुक्तांच्या आदेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ८००पेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे.जिल्ह्यातील कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाचे वेतन देयक वेतन विभागाने स्वीकारले नसल्याने १ तारेखला पगार या शासन आदेशाचा फज्जा उडाला आहे. कोल्हापूर विभागातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची आॅनलाईन संचमान्यता १२ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली आहे. या संचमान्यता प्रतीवर उपसंचालक, कोल्हापूर यांची स्वाक्षरी न झाल्याने ३० सप्टेंबरअखेर संचमान्यता प्रती संस्कारित शाळांना मिळालेल्या नाहीत. शिक्षण आयुक्त, पुणे यांनी काढलेल्या आदेशानुसार संचमान्यता प्रत जोडली असेल तरच वेतनदेयक स्वीकारावे. यामुळे जिल्ह्यातील एकाही शाळेचे वेतनदेयक न स्वीकारल्याने सर्वांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनापासून वंचित राहावे लागणार आहे. गणेशोत्सव सुटीनंतर शाळेत रूजू झालेल्या शिक्षकांना आॅक्टोबरमध्ये वेतन मिळणार नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश ओताडे, सचिव अनिल उरूणकर यांनी आयुक्तांच्या या आदेशाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)कोल्हापूर विभागातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांची संचमान्यता १२ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. परंतु स्वाक्षरीच न झाल्याने या संचमान्यतेची प्रत या शाळांना मिळाली नाही. शिक्षकांचा व महाविद्यालयाचा कोणताही दोष नसताना त्यांचे पगार थांबले आहेत हे अन्यायकारक आहे. - प्रकाश औतारी,अध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना
प्राध्यापक अद्याप पगाराला वंचितच
By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST