रजनीकांत कदम -कुडाळ --कुडाळ गणेश घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा, गणपती विसर्जनाच्या ठिकाणी अनेक सोयीसुविधांचा अभाव त्यामुळे गणपती विसर्जनास नेताना मूर्तींना धोका पोहोचण्याची संभावना आहे. तरीपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.कोकणातील प्रमुख व सर्वांचा आवडता गणेश चतुर्थी सण अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यास मोठ्या उत्साहात तयार आहेत. कुडाळातही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु गणपती विसर्जनाच्यावेळी मात्र या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जाताना जो रस्ता कुडाळ भंगसाळ नदीकडील गेलेल्या घाटाकडे जातो त्या रस्त्याची अनेक वर्षे दुरवस्था असल्याने गणपती विसर्जनास नेताना मोठी कसरत याठिकाणी करावी लागत आहे. कुडाळातील गणपती विसर्जनासाठी भंगसाळ नदीचा वापर केला जातो. जनतेला गणपती विसर्जन करण्यासाठी सोयीचे व्हावे याकरीता याठिकाणी नदीच्या किनारी घाट बांधण्यात आला आहे. मात्र, गेली अनेक वर्षे याठिकाणचा गणेशघाट किंवा येथे येणाऱ्या रस्त्यावर सोयीसुविधांचा अभाव आहे.आता याबाबत शासनाने तत्काळ कारवाई न केल्यास येथील जनतेत शासनाच्या विरोधात जनप्रक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत शासनाने तत्काळ भूमिका घेऊन येथील सोयीसुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे.फायबर होडी ठेवणे गरजेचे याठिकाणी गणपती विसर्जनास मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण येतात. काहीजण स्वत: नदीत उतरून गणपतीचे विसर्जन करतात. तसेच भंगसाळ नदीला नेहमी मोठ्या प्रमाणात पाणी असते. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास याठिकाणी कोणतीही उपाययोजना नाही म्हणून याठिकाणी फायबर होडी असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून आगामी गणेशोत्सव काळात समस्या जाणवणार नाही.
कुडाळमधील समस्या : सार्वजनिक बांधकामसह प्रशासनाचे दुर्लक्ष
By admin | Updated: August 22, 2014 01:08 IST