ओरोस : जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. कुडाळ तालुक्यात घरांवर झाडे पडल्याने व विहीर खचल्याने सुमारे ६0 हजारांचे, तर चेंदवण येथे शाळेची खोली कोसळली. सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे गायीवर वीज पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. जिल्ह्यात आज, मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १०४२.४० मि.मी. पाऊस पडला असल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील कुंदे गावातील सत्यवान परब यांच्या घरावर झाड पडून त्यांच्या घराचे तीन हजार २०० रुपयांचे, तर संतोष बागवे यांच्या घरावर झाड पडून तीन हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मधुकर बांदिवडेकर यांची विहीर खचल्याने ४० हजार रुपयांचे, तर आंब्रड येथील गोविंद राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडल्याने सहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आज, दिवसभरात ५४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी दिले आहेत. देवगड तालुक्यात, शहर व परिसरात १५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत १२४ मि.मी. पावसाची नोंद झाली. मोसमात आता एकंदर ११२१ मि.मी. पाऊस झाला आहे. कुडाळात ६0 हजारांचे नुकसान कुडाळ तालुक्यात दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ६0 हजारांचे नुकसान झाले आहे. यात कुंदे येथील मधुकर बांधिलकर यांची विहीर खचल्याने ४0 हजारांचे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)
२४ तासांत अतिवृष्टीची शक्यता
By admin | Updated: July 16, 2014 01:02 IST