कुडाळ : शाळांमधील चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढत असून कुडाळ तालुक्यातील शाळांमध्ये चोऱ्या होऊ नयेत, याकरिता सर्व शाळांना सुरक्षारक्षक नेमावेत, तसेच इतर महत्त्वाच्या वस्तूयोग्य काळजीपूर्वक ठेवाव्यात, अशा सूचना पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी कुडाळ तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या बैठकीत केले. हल्ली घरफोडी, दुकान फोडीसारख्या वाढत्या प्रकारांबरोबरच मोठ्या प्रमाणात शाळेतील वस्तूंची चोरी होण्याचे प्रकार वाढले आहे. शाळेचे ठिकाण हे शक्यतो निर्जनस्थळी असते. सुरक्षा व्यवस्था नसल्याने शाळेचे दरवाजे, खिडक्या तोडून आतील वस्तू, कॉम्प्युटर, भांडी तसेच इतर वस्तूंची चोरी केली जाते. कुडाळ तालुक्यात अशाप्रकारची घटना आतापर्यंत घडली नसली, तरी अशी घटना कुठच्याच शाळेत घडू नये, यासाठी पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तालुक्यातील मुख्याध्याकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे एस. टी. आवटी, कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे व्ही. के. परब, सरंबळ हायस्कूलचे पी. एम. साटम, पणदूर हायस्कूलचे एस. जे. शेळके, साळगाव हायस्कूलचे एस. पी. लाड, लक्ष्मीनारायण विद्यालय, बिबवणेचे एस. एल. कुबल, कुडाळ फातिमाबी उर्दू हायस्कूलचे सय्यद मुश्ताक, बॅ. नाथ पैचे अशोक येजरे, मांडकुली हायस्कूलचे सुरेंद्र खोत, कलेश्वर नेरूर माध्यमिक विद्यालयाचे गीता पाल्येकर, तुळसुली विद्यालयाच्या आर. खानोलकर, बाव रामेश्वर विद्यालयाचे एस. एस. खोत, न्यू इंग्लिश स्कूल कुडाळचे एस. ए. पाटील आदी उपस्थित होते. इंगळे म्हणाले, तालुक्यातील शाळांमधील साहित्य चोरीस जाऊ नये, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. शाळेचे दरवाजे, खिडक्यांना चांगली सुरक्षा द्यावी, रात्रीच्यावेळी आवश्यक त्या ठिकाणी विजेची सोय करावी, शाळेच्या पहाऱ्यासाठी सुरक्षारक्षक ठेवावा. (प्रतिनिधी)
चोऱ्या रोखण्यासाठी प्रत्येक शाळेत सुरक्षारक्षक नेमावेत
By admin | Updated: November 16, 2014 23:46 IST