कणकवली : येथील बसस्थानकाशेजारील टपाल खात्याच्या जमिनीवर बांधकाम करण्याची वर्षाची मुदत संपली आहे. तेथे आता इमारतीचे बांधकाम करता येणार नसल्याची नोटीस नगरपंचायतीने बजावली असल्याची माहिती मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली.येथील बसस्थानकाशेजारी टपाल कार्यालयाची जागा अनेक वर्षे विनावापर पडून होती. या जागेवर कार्यालय बांधकामासाठी टपाल खात्याकडून हालचाली सुरू झाल्या होत्या. नगरपंचायतीकडून इमारत बांधकामासाठी वर्षभराची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या मुदतीत टपाल खात्याकडून इमारत बांधकामास सुरूवातच झाली नाही. ही मुदत संपल्याने आता त्या जागी इमारत बांधता येणार नसल्याची नोटीस नगरपंचायतीने बजावली आहे.दरम्यान, कलमठ बायपास मार्गात टपाल खात्याच्या जागा मिळणे आवश्यक आहे. कलमठ बायपास मार्गाचे काम प्रगतीपथावर असून बसस्थानकाशेजारी टपाल खात्याच्या जागेतून मुंबई-गोवा महामार्गाशी हा मार्ग जोडला जाणार आहे. मात्र, टपाल कार्यालयाकडून जागा मिळण्यासाठीची प्रक्रिया रखडलेली आहे. या नियोजित मार्गासाठी नगरपंचायतीच्या वतीने बसस्थानकाशेजारील पोस्ट खात्याच्या जागेमध्ये ३.३ गुंठे जागेत क्रमांक ५४ हे आरक्षण टाकण्यात आले होते. मात्र, पोस्ट खात्याकडून ही जागा गेली दोन वर्षे संपादीत होत नव्हती. पोस्ट खात्याने जागा न दिल्याने हा बायपास मार्ग होण्यात अडथळे निर्माण झाले होते. (प्रतिनिधी) अतिक्रमण न होण्याची दक्षतामहामार्गाशेजारी विक्रेत्यांचे वारंवार अतिक्रमण होत असते. आता हे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे मुख्याधिकारी तावडे यांनी सांगितले. कोंडवाड्यासाठी प्रयत्न सुरु कणकवली शहरातील मोकाट जनावरांवर कारवाईची सुरूवात करण्यासाठी नगराध्यक्षांनी ५ जानेवारी ही मुदत दिली होती. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी गोपुरी आश्रमात भेट देऊन आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अद्याप कारवाईसाठी येणारा खर्च आणि गोपुरी आश्रमाला द्यावा लागणारे शुल्क आदी बाबी ठरवणे बाकी आहे. त्यासंबंधीचा करार झाल्यानंतर मगच ही कारवाई सुरू होऊ शकते
टपाल कार्यालयास नगरपंचायतची नोटीस
By admin | Updated: January 6, 2015 23:58 IST