सावंतवाडी : शहरातील एका महाविद्यालयीन युवतीचे फेसबुक अकाऊंट हॅक करीत अज्ञाताने तिच्याच मैत्रिणींना अश्लील मॅसेज पाठविण्याच्या प्रकाराने संबंधित युवती चांगलीच घाबरली आहे. तिने मंगळवारी सायंकाळी उशिरा सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांची भेट घेऊन कैफियत मांडली. मात्र, उशिरापर्यंत युवतीने तक्रार दिली नव्हती.शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीचे फेसबुक अकाऊंट चार दिवसांपासून अज्ञात व्यक्ती वापरत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या अकाऊंटवरून रात्री अपरात्री चॅटिंग करणे, तिच्याच मैत्रिणींना तुमचे डोळे बंद करून फोटो पाठवा, असे सांगणे त्यांना अश्लील फोटो पाठविणे, असे प्रकार सुरू होते. या प्रकाराने संबंधित युवतीच्या मैत्रिणींमध्येही खळबळ माजली असून, अनेक मैत्रिणींनी त्या युवतीला समक्ष भेटून आलेले मॅसेज दाखविले. त्यामुळे या घाबरलेल्या युवतीने थेट पोलीस ठाणे गाठत आपली कैफियत पोलिसांजवळ मांडली. या प्रकाराबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार यांना विचारले असता, संबंधित युवतीने तक्रार दिली, तर आम्ही त्यानुसार सायबर क्राईमचा गुन्हा नोंदवून सर्व मिळवू, असे सांगितले. (प्रतिनिधी)
फेसबुक अकाऊंट हॅक करून अश्लील मॅसेज
By admin | Updated: August 26, 2015 00:03 IST