वाटूळ : सायली संभाजी पवार (मंदरुळ-पवारवाडी, राजापूर) या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे़ मात्र, मृत्यूपूर्वी सायलीने पाठविलेल्या एसएमएसमुळे या प्रकरणातील आणखी गूढ वाढले आहे़ राजापूर पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत़ मंदरुळ येथील सायली पवारला जाळल्या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध होताच तालुक्यात खळबळ उडाली आहे़ ‘लोकमत’मधील वृत्त वाचून तालुक्यातील अनेकजणांनी मंदरुळ-पवारवाडी येथे जाऊन सायलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले़ राजापूर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक ओठवणेकर यांनी घटनास्थळी जाऊन आज, रविवारी पाच तास कसून चौकशी केली़ सायलीने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाबानुसार पोलिसांना घटनास्थळी काहीही पुरावा आढळून आला नाही़ पोलीस उपनिरीक्षक ओठवणेकर यांनी घटनास्थळाला घटनेनंतर अवघ्या ४० मिनिटांच्या आत भेट दिली़ त्यावेळी ते ओणी येथे बंदोबस्तात होते़ त्यावेळी त्यांनी घटनास्थळाला दिलेल्या भेटीनंतर तिने आत्महत्याच केली यावर ते ठाम आहेत़ मात्र, सायलीने मृत्यूपूर्वी जबाब असा का दिला, याची कसून चौकशी करीत आहेत़ मृत्यूपूर्वी सायलीने पाठविलेला तो एसएमएस काय व कोणाला, याचा तपास पोलीस करीत आहेत़ मात्र, दोन युवकांनी रॉकेल ओतून पेटविले, हा तिने बनाव केल्याचे पोलिसांचे मत आहे़ अतिसंवेदनशील स्वभावानेच सायलीचा बळी घेतला, असा निष्कर्षही पोलिसांनी काढला आहे़ (वार्ताहर)लेक गमावली, ससेमिरा नको आपली अत्यंत हुशार व लाडकी लेक आम्ही गमावली़ आता आम्हाला पोलिसांचा ससेमिरा नको़ त्यांनी त्यांची चौकशी करावी, असे सायलीच्या वडिलांचे मत असून त्यांना या प्रकरणावर काहीही बोलायचं नाही, असेच यावरून दिसून येत आहे़ मात्र, सायलीसारख्या शिस्तप्रिय व हरहुन्नरी मुलीच्या जाण्याचा चटका सर्वांनाच लागून गेला आहे़
सायलीने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निष्कष
By admin | Updated: September 7, 2014 23:21 IST