कणकवली : शहरात प्रथमच अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलन होत आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी शहरवासीयांकडून योगदान मिळेल. तसेच विविध स्तरावर मदत उपलब्ध करून हे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार मान्यवरांनी येथील बैठकीत व्यक्त केला. अखंड लोकमंच सिंधुदुर्ग या संस्थेच्यावतीने शहरात होणाऱ्या अखिल भारतीय चित्र-शिल्प संमेलनाच्या नियोजनाची बैठक नामानंद मोडक यांच्या अध्यक्षतेखाली भवानी मंगल कार्यालयात झाली. यावेळी विविध संस्था प्रतिनिधींसह आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्षा प्रज्ञा खोत, रंगकर्मी डॉ. राजेंद्र चव्हाण, दिग्दर्शक सुहास वरूणकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते भाई खोत, अशोक करंबेळकर आदींनी संमेलनासाठी सहाय्य करण्याची ग्वाही दिली.संमेलनामागील भूमिका मांडताना मोडक म्हणाले की, आजवर साहित्य संमेलन, नाट्य, संगीत, गझल संमेलने होतात. या संमेलनांत सजावट, नेपथ्य, रंगकाम, रांगोळी आदींचा समावेश होतो. त्यासाठी राबणारे कलाकारांना त्या मंचावर अभिव्यक्त होता येत नाही. त्यामुळे चित्र, शिल्प, याबरोबरच छायाचित्रकार, रांगोळीकार, मूर्तीकार, नेपथ्यकार, व्यंगचित्रकार या सर्वांच्या कलांना मुक्ताविष्कार देणारे संमेलन कणकवलीत आयोजित करण्यात आहे. प्रा. विजय जामसंडेकर म्हणाले की, व्यक्त होण्याचे चित्र हे प्रभावी माध्यम आहे. भाषा किंंवा इतर कला चित्रांच्या माध्यमातून शिकता येतात. चित्र, शिल्प कलेवर जगभरात मोठे काम होत आहे. त्यात आपले कलाकार मागे पडू नयेत. यासाठी अशी संमेलने व्हायला हवीत. आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, सतीश सावंत यांनीही संमेलन यशस्वी करण्याची भूमिका मांडली. चित्र-शिल्प संमेलन कणकवलीत होत असून ते भूषणावह असल्याचे नगराध्यक्षा अॅड. खोत म्हणाल्या. नगरपंचायतीचे सहकार्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. सुहास वरूणकर यांनी कलासंमेलनाच्या माध्यमातून शहरात सांस्कृतिक केंद्र उभे रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नियोजन बैठकीत प्रा. हरिभाऊ भिसे, मूर्तिकार मारूती पालव, आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, नगरसेवक सुशांत नाईक, दशावतारी कलावंत बी. के. तांबे, हरी परब, नारायण हजेरी आदी मान्यवरांनी विचार मांडले. विजय पालकर, मनोज मेस्त्री, इंद्रजित खांबे, प्रशांत काणेकर, राखी अरदकर, समीर गुरव, चेतन तारी आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी तर आभार संतोष राऊळ यांनी मानले. (प्रतिनिधी)
चित्र-शिल्प संमेलन यशस्वी करणार
By admin | Updated: December 1, 2014 00:19 IST