मालवण : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या ‘पळपुटा आमदार’ या विधानाचा आमदार वैभव नाईक यांनी चांगलाच समाचार घेत राणे यांना चिमटे काढले. जिल्ह्यातील सुज्ञ जनतेने नारायण राणे यांना नाकारून मुंबईला पळविले. त्यानंतर मुंबईच्याही जनतेने त्यांना नाकारून मुंबईतून पळवून लावले आहे. त्यामुळे कोण ‘पळपुटा’ आहे याचा राणे यांनी विचार करावा, अशी नाईक यांनी बोचरी टीका करीत चोख प्रत्युत्तर दिले. शिवसेना नेहमीच मच्छिमारांच्या पाठीशी राहिली आहे. बेकायदेशीर आणि पर्ससीन मासेमारीप्रश्नी शिवसेनेची भूमिका विरोधीच राहील अशी स्पष्टोक्ती नाईक यांनी दिली. येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबू टेंबुलकर, तुळशीदास मयेकर, तपस्वी मयेकर, सोमनाथ लांबोर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. नाईक म्हणाले, जनतेच्या न्याय हितासाठी शिवसैनिक गुन्हे दाखल करून घेण्यास कधीही माघार घेणार नाहीत. मच्छिमारांनी कायदा हातात घेऊ नये व जिल्ह्यात शांतता राहावी हीच आपली भूमिका आहे. मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर पुढील आठवड्यात मालवण दौऱ्यावर येणार आहेत. मत्स्योद्योग मंत्र्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही मच्छिमारांना पाठिंबा असून, येत्या हिवाळी अधिवेशनात मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत निश्चितच आवाज उठविला जाईल, असे नाईक यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राणेंनाच जनतेने पळवून लावले
By admin | Updated: November 7, 2015 22:19 IST