ओरोस : सावंतवाडी बाहेरचावाडा येथील सेंट्रल इंग्लिश स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराला पालक कंटाळले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी १२ पालक बेमुदत उपोषणास तर ३६ पालक साखळी उपोषणास बसणार आहेत. हे उपोषण सावंतवाडी मर्कजी जमात मुंबई यांच्या मालकीच्या पटांगणावर २१ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे.सेंट्रल इंग्लिश स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी इनियाज खानपुरी यांच्या नेमणुकीचा आदेश माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी रद्द करावा. मोहम्मद सनान वसीम शेख याच्यावर झालेल्या अन्यायाची चौकशी होऊन दोषींवर त्वरीत कारवाई करावी, मोहम्मद सनान वसीम शेख या विद्यार्थ्याला वर्गात बसवून घेण्याचे आदेश देण्यात यावेत. पहिली ते दहावीच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांची फी भरून घेण्यास नकार देण्यात आलेला आहे, त्यांची फी स्वीकारण्यात यावी व पावती देण्यात यावी. सावंतवाडी पोलिसांनी मुलांवर झालेल्या अन्यायाची, अत्याचाराची अद्याप चौकशी केलेली नसल्यामुळे सावंतवाडी पोलिसांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे निवेदन सर्व संबंधितांना देण्यात आले आहेत. या शाळेत पहिली ते दहावीचे वर्ग असून ही विनाअनुदानित शाळा आहे. (वार्ताहर)
पालक आजपासून उपोषणास बसणार
By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST