मालवण : पर्ससीननेट मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांनी न्यायालयीन लढा सुरू केला असून, या लढ्यातील कायदेशीर बाजूंची पडताळणी करणार आहे. त्यांचा वाद मिटावा यासाठी दोन्ही बाजंूच्या मच्छिमारांना घेऊन मार्ग काढला जाईल, असे सांगतानाच सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीला आपला विरोध राहील, अशी स्पष्टोक्ती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी येथे आज, बुधवारी दिली.येथील नीलरत्न निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नारायण राणे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सभापती उदय परब, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, पंचायत समितीचे सदस्य संजय ठाकूर, शहराध्यक्ष लीलाधर पराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मंदार केणी यांच्यासह अन्य उपस्थित होते.यावेळी नारायण राणे म्हणाले, ‘पर्ससीननेट मासेमारीच्या पद्धतीमुळे समुद्रातील मासेमारीवर होणारे परिणाम’ याविषयी डॉ. सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल राज्य सरकारने अद्याप चर्चेसाठी खुला केलेला नाही. तो अहवाल सरसकट स्वीकारावा हे सरकारवर बंधनकारक नाही. मात्र, या संदर्भात तज्ज्ञांची कार्यशाळा आयोजित करून निर्णय घेण्यात येईल, असे राणे म्हणाले. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनधिकृत पर्ससीननेट मासेमारीला बंदी आहे. याला आपला विरोधच राहील, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील दीपक केसरकर, प्रमोद जठार, वैभव नाईक यांच्यासह विजय सावंत यांच्यावरही राणेंनी टीका केली. विजय सावंत यांना पक्षात किंमत नाही. त्यांना कणकवली येथून उमेदवारी द्यायचे सोडूनच द्या. त्यांची साधी उमेदवारीसाठी मुलाखतही घेण्यात आली नाही. वाळू, सिमेंटच्या कामांतून चार पैसे सुटतात का, हे पाहणाऱ्यांना निवडून द्यायचे, की विकास करणाऱ्यांना निवडून द्यायचे हे जिल्हावासीयांनी ठरविले पाहिजे. कुडाळ-मालवणमधून निवडणूक लढविण्याबाबत पक्ष निर्णय घेईल. मात्र, २५ वर्षांत जिल्ह्यात केलेल्या कामांचे आपल्याला म्हणावे तसे फळ मिळाले नाही. यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहायचे की नाही हे मला ठरवावे लागेल, असे राणे म्हणाले.
पर्ससीननेट मासेमारीला विरोधच
By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST