देवगड : श्री वर्धमान फर्टीलायझर्स अँड सीड्स प्रायव्हेट लि. या कंपनीला खत खरेदी प्रकरणी दिलेल्या ३५ लाख ४६ हजार १५८ रुपयांच्या पाच धनादेशांपैकी १० लाख ३९ हजार ३५८ रुपये किंमतीचे धनादेश बँकेत न वटल्यामुळे या कंपनीने देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकांसह सर्व संचालकांना वकीलाद्वारे नोटीस बजावली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड तालुका खरेदी-विक्री संघाने या खताच्या कंपनीकडे दाणेदार १८:१८:१० मिश्रखताची खरेदी वारंवार केलेली आहे. १९ आॅगस्ट २०१४ रोजी ३६ लाख ४६ हजार १५८ रुपये संघाकडे येणे बाकी असलेल्या रकमेपैकी १ लाख रुपये २० आॅगस्ट २०१४ रोजी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मोहोळ येथे कंपनीच्या खात्यात वर्ग केले.उर्वरित रक्कम ३५ लाख ४६ हजार १५८ रुपये एवढी रक्कम संघाकडे येणे बाकी होती. या येणे बाकी रकमेचे २५ आॅगस्ट २०१४, १० सप्टेंबर २०१४, २१ सप्टेंबर २०१४, ३० सप्टेंबर २०१४ व १० आॅक्टोबर २०१४ या तारखांचे अनुक्रमे २ लाख ५२ हजार ७५८ रुपये, ७ लाख ८६ हजार ६०० रुपये, ८ लाख ५२ हजार ७०० रुपये, ८ लाख १८ हजार १०० रुपये व ८ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे चेक क्रमांक ५०२५८९ ते ५०२५९३ हे स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा नागेश्वर नगर ता. देवगडचे चेक संघाने कंपनीला दिले होते. देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने दिलेला २ लाख ५२ हजार ७५८ चा धनादेश क्र. ५०२५८९ व ७ लाख ८६ हजार ६०० रुपयेचा धनादेश क्र. ५०२५९० हे १२ सप्टेंबर २०१४ रोजी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखा डेक्कन जिमखाना पुणे व स्टेट बँक आॅफ इंडिया यांनी इनसफिशियंट फंड्सचा शेरा देऊन कंपनीला परत केला. हे दोन्ही धनादेश न वटता परत आल्याने १० लाख ३९ हजार ३५८ रुपयांची फसवणूक झाली. देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने परिक्रमा अभिलेख कायद्याच्या कलम १३८ प्रमाणे गुन्हा केला आहे. व्यवस्थापक व संचालक हे संस्थेचे जबाबदार प्रतिनिधी असल्याने नोटीसमध्ये पक्ष म्हणून समाविष्ट करण्यात आल्याचे नोटीसीत म्हटले आहे.नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांत १० लाख ३९ हजार ३५८ रुपये विनाविलंब विना तक्रार कंपनीच्या खात्यात जमा करावी त्याशिवाय उर्वरित धनादेशांची रक्कम कंपनीच्या खात्यात आरटीजीएसद्वारे वर्ग करावी. अन्यथा फौजदारी अथवा दिवाणी स्वरूपाची कारवाई अथवा परिक्रमा अभिलेख कायद्याच्या कलम १३८ प्रमाणे कारवाई करावी लागेल. कारवाईस येणाऱ्या खर्चास संघ जबाबदार राहील. नोटीसीचा खर्च ५ हजार रुपये देवगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघावर ठेवण्यात आला आहे. श्री वर्धमान फर्टीलायझर्स अँड सीड्स प्रायव्हेट लि. या कंपनीतर्फे व्यवस्थापकीय संचालक रविकांत रामचंद्र शहा, रा. पुणे यांच्यावतीने अॅड. सतीशकुमार देशमुख यांनी नोटीस दिली आहे. (प्रतिनिधी)
आश्वासन पाळले नाहीया चेकवरील तारखेपूर्वी चेकवरील रक्कम आर.टी.जी.एस.ने कंपनीच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन संघाने दिले होते. आरटीजीएस पद्धतीने कंपनीकडे रक्कम जमा झाल्यानंतर कंपनीला देण्यात आलेले चेक कंपनीने संघास परत करावे असे २० आॅगस्ट २०१४ रोजीच्या संघाच्या पत्रात केली होती. संघाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून कंपनीने रकमेची मागणी केली नाही. परंतु संघाने कंपनीला दिलेले आश्वासन पाळले नाही. आरटीजीएसने कंपनीच्या खात्यात रक्कम जमा केली नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.