चिपळूण : शहरातील नगर परिषद दवाखान्यामध्य कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मिर्लेकर या प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्याने या दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा पदभार कोणाकडे देणार, याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे. सध्या डेंग्युसदृश साथ फैलावत असल्याने या दवाखान्यात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे. शहरातील नगर परिषदेची आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणात असून, आरोग्य सेवासुविधा देण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने स्वतंत्र दवाखाना सुरु केला आहे. मात्र ऐन साथीच्या काळातच याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या दवाखान्यामध्ये कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी मिळावा, यासाठी दीड ते दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागली.नगर परिषदअंतर्गत बालकांना विविध डोस देण्यापासून गरोदर महिलांची तपासणी केली जाते. आरोग्यविषयक जनजागृतीही या विभागातर्फे केली जात आहे. डॉ. कोमल मिर्लेकर यांच्या रुपाने नगर परिषदेला कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी मिळाला होता. त्यांनी वर्षभराच्या कालावधीत नागरिकांना आरोग्यविषयक चांगली सेवा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. सध्या डॉ. मिर्लेकर या २ दिवसांपूर्वी प्रशिक्षणासाठी अन्य ठिकाणी गेल्याने नगर परिषदेतील दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्याची वानवा असल्याचे चित्र आहे. चार दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या आरोग्य व वैद्यकीय समितीच्या बैठकीत औषधे खरेदी करण्याबाबतचा ठराव करण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकारी आहेत की नाहीत, याबाबत काही चर्चा झाली नाही. डॉ. मिर्लेकर या प्रशिक्षणावरुन केव्हा येणार, याबाबतही अधिक माहिती मिळू शकली नाही. बहादूरशेख येथे नगर परिषदअंतर्गत नागरी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून, गांधीनगर व अन्य परिसरातील सर्वसामान्य जनतेला येथील सुविधेचा लाभ होत आहे. मात्र, नगर परिषदेतील वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षणाला गेल्याने नागरी सुविधा केंद्रातील डॉ. प्रीती शिंदे यांची येथील दवाखान्यात नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. प्रत्यक्षात सोमवारी येथील दवाखान्यात डॉक्टर उपलब्ध होतील अथवा कसे याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. चिपळूण शहरात नगरपरिषद प्रशासनात दवाखान्याचा कार्यभार कोणाकडे सोपवायचा याबद्दल चर्चा सुरूच आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय अधिकारीच नाहीत
By admin | Updated: November 9, 2014 23:34 IST