रत्नागिरी : येत्या १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश कमिटीने रत्नागिरी - सिंधुदुर्गचे माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर सोपविली आहे.कोकणातील रत्नागिरी - सिंधुदुर्गचे प्रचार प्रमुख म्हणून आता नीलेश राणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, स्थानिक प्रमुख नेते, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष यांची मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करणार आहेत. तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून प्रचाराची रुपरेषा, मुद्दे यांचे नियोजन करणार आहेत.खासदारकीच्या पाच वर्षात त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार दौरे केले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसबरोबरच विरोधी पक्षांचीही त्यांना जवळून ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे. पुढील आठवड्यापासून ते या दोन्ही जिल्ह्यांचे दौरे सुरू करणार आहेत. आक्रमक प्रचाराच्या अपेक्षेनेच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
निलेश राणे रत्नागिरी - सिंधुदुर्गचे प्रचार प्रमुख
By admin | Updated: September 20, 2014 00:31 IST