कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी पारंपरिक पद्धतीने घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. ११३ ठिकाणी सार्वत्रिक दुर्गोत्सवानिमित्त श्री दुर्गामातेची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. विजयादशमीपर्यंत देवीचा जागर करण्यात येणार असून गरबा नृत्याच्या सहाय्याने तरुणाई रात्र जागविणार आहे. नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त भजन, फुगड्या, रास दांडिया, नृत्य व वेशभूषा स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर अशा उपक्रमांचे आयोजनही विविध मंडळांनी केले आहे. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस या उपक्रमांमुळे गजबजणार आहेत.कणकवली शहरात बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी शहरातून सवाद्य मिरवणुुकीने देवी उत्सवस्थळी आणण्यात आली. तर गुरुवारी राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना तसेच गोंधळी समाजबांधवांनी ढोलताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात देवीची मूर्ती उत्सवस्थळी आणली. त्यानंतर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. नवरात्रोत्सवामुळे जिल्ह्यात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. बांदा, सावंतवाडी, कुडाळ, देवगड, वेंगुर्ले आदी तालुक्यातही गुरुवारी श्री दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ग्रामदेवतांच्या मंदिरामध्येही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिरांमध्ये देवीचा जागर केला जाणार आहे. एकंदरीत पुढील नऊ दिवस जिल्ह्यातील सर्वच भागातील वातावरण मंत्रमुग्ध राहणार आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात नवरात्रोत्सवास प्रारंभ
By admin | Updated: September 25, 2014 23:26 IST