चिपळूण : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६च्या चौपदरीकरणाबाबत दि. २० रोजी सायंकाळी ५ वाजता विरेश्वर मंदिर येथे नागरिकांची खास बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामध्ये महामार्ग रुंदीकरण चिपळूणच्या फायद्याचे की तोट्याचे याबाबत पुढील भूमिका ठरणार आहे. चिपळूण शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे चौपदरीकरण होणार आहे. यामध्ये महाविद्यालये, शाळा, शासकीय कार्यालये याकडे जाण्यासाठी ‘क्रॉसिंग वे’ नाही. महामार्गाच्या नियमानुसार ब्रीज बांधूनही वेळोवेळी बदललेले नियम यामुळे अपार्टमेंट व घरे यांना धोका निर्माण होणार आहे. रूंदीकरण ३० मीटर होणार की ४० मीटर? बहादूरशेख नाका ते पाग बायपासपर्यंत उड्डाणपूल झाल्यास नेमके काय होणार? लाईफ केअर हॉस्पिटल बायपासकडून महामार्ग नेणे कितपत फायदेशीर आहे, या सर्व बाबींचा विचार करताना शहरातील व्यापारावर त्याचा नेमका काय परिणाम होईल, या सर्व गोष्टींबाबत चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेवक राजू भागवत यांनी केले आहे. या बैठकीतील निर्णयानुसार दि. २१ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विश्रामगृहातील बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सर्वांसमोर जनतेला आपल्या व्यथा मांडण्याची संधी मिळणार आहे. चिपळूण शहरात चौपदरीकरणाबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून, त्याबाबत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दि. २० रोजी महत्त्वाची बैठक होत आहे.राष्ट्रीय महामार्गाचा एक टप्पा शहरातून जात असल्याने त्याचा नागरी जीवनावर कोणता परिणाम होणार आहे. याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याबाबत या बैठकीचे आयोजत करण्यात आले आहे. या बैठकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दि. २१ रोजी होणाऱ्या चचेनंतर या विषयाला पुन्हा जोर येणार आहे. (वार्ताहर)निर्णयाकडे सर्वांचे लक्ष-चिपळूण शहरातील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाबाबत आज महत्त्वाची बैठक.-आजच्या बैठकीनंतर पुन्हा दि. २१ रोजी महत्त्वाची चर्चा होणार.-शहरातील रूंदीकरण नेमके किती होणार, कोठून होणार, त्याचे परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय महामार्ग ---चिपळुणात उद्या विशेष बैठक
By admin | Updated: August 18, 2014 21:36 IST