कुडाळ : जनतेने नाकारलेल्या व फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या नारायण राणे यांनी आता पराभव झाल्याने स्वत:ची काळजी करावी. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची काळजी करू नये, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नारायण राणे यांच्यावर पलटवार केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान भोगवे येथे आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी खासदार राऊत म्हणाले की, प्रकल्पाच्या नावाखाली येथील जनतेच्या जमिनी हडप करण्याचे धोरण असणाऱ्या जनतेला लुबाडणाऱ्या राणेंचा येथील जनतेने या अगोदरच पराभव केला आहे. त्यांची आदळआपट करण्याची सवय असून ते लोकांवर पराभवाचे खापर फोडत असून ‘गिरा तो भी टांग उपर’ अशी त्यांची अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा हा कौटुंबिक असल्याचे या अगोदरच जाहीर करण्यात आले होते. तसेच या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोकणी जनतेच्याही समस्या ऐकून घेतल्या आहेत. आता कोकणात नव्याने उभारी येईल. कोकणाचा सर्वांगीण विकास झपाट्याने होईल. गौण खनिज बंदी उठावी यासाठीही मुख्यमंत्री यांच्या बरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली. खासदार विनायक राऊत म्हणाले की, शिवसेना ही भक्कम असून शिवसेनेचे शिलेदार निष्ठावंत आहेत. त्यामुळे कोणीही फुटणार नाहीत. फोडाफोडीचे बाप नारायण राणे असून या अगोदर त्यांनी राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी फोडले. त्यामुळे त्यांच्या स्वप्नी जे असते तेच त्यांच्या मनात येते, असे सांगून राणे यांना टोला लगावला व आमचे आमदार फुटणार नाहीत असेही सांगितले. (प्रतिनिधी)
नारायण राणे यांनी स्वत:ची काळजी करावी
By admin | Updated: November 23, 2014 23:58 IST