रत्नागिरी : या मतदार संघातील जनतेला विकास नको आहे. सुसंस्कृत उमेदवार नको आहे. नीलेश राणे यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरीत केली. काही वेळातच त्यांनी राजीनामा पाठवूनही दिला. २५ वर्षांनी आता कळले - लोकांना कामेच नको आहेत. हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. मागील लोकांनी का विकास केला नाही, हे आता मला कळले. त्यामुळे आपण यापुढे विकासात्मक सर्वच अॅक्टिव्हिटी थांबविणार आहोत. राऊतांची नीलेश राणेंशी तुलना नाहीच - ते म्हणाले, नीलेश राणे यांनी केलेल्या कामांची बरोबरी विनायक राऊत करूच शकणार नाही. पण, जनतेलाच चारित्र्यहीन, कमी शिकलेली माणसे हवीत, कामे नकोत, अशी खंतही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. विरोधकांनी हुरळून जावू नये - यासाठी मित्र पक्षाचे सहकार्य कितपत, यावर मतप्रदर्शित करताना राणे म्हणाले की, मला मित्र पक्षावर कुठलाच आरोप करायचा नाही. उलट रत्नागिरी - सिंधुदुर्गमधील सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीबद्दल आभार मानायला हवे. राणे शेवटी म्हणाले की, या रिझल्टचा माझ्यावर कुठलाच परिणाम होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी हुरळून जाऊ नये.(प्रतिनिधी)
नारायण राणे यांचा राजीनामा
By admin | Updated: May 17, 2014 00:11 IST