मालवण : येथील भूमीशी, देवदेवतांशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा धनदांडग्यांनी येथील ग्रामस्थांच्या छाताडावर बसवून सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याचा घाट आघाडी सरकारने घातला आहे. अशा प्रकारची भूमिका आम्हाला कदापि मान्य नाही. सी-वर्ल्ड प्रकल्पात स्थानिकांचा सहभाग हवा या मताचा मी आहे. तोंडवळी- वायंगणी गावातील ज्येष्ठ जाणकार नागरिकांना सोबत घेऊन या गावांचा विकास करावयाचा आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पाच्या नावाखाली स्वत:चे उद्योग सुरू करण्याचा नतद्रष्टपणा अजिबात खपवून घेणार नाही, अशी भूमिका खासदार विनायक राऊत यांनी मांडली. तोंडवळी सापळेबाग येथील ग्रामस्थांनी खासदार राऊत यांची भेट घेऊन गावातील सदस्यांसंदर्भात वेळ देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे खासदार राऊत यांनी रविवारी तोंडवळी सापळेबागवासियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राऊत म्हणाले, मालवण येथे सी-वर्ल्ड प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले होते. ते प्रेझेंटेशन डुप्लीकेट होते. प्रत्यक्षात सी-वर्ल्ड प्रकल्पाला पुणे येथील टेक्नॉलॉजी पार्कच्या आराखड्यानुसार ३८१ एकर जमीन आवश्यक आहे. मात्र अधिकची जागा संपादन करून लोकांच्या जमिनी हडप करण्याचे राजकीय कपट कारस्थान राणे सरकारने आखले आहे. तोंडवळी-वायंगणी येथील एकही घर किंवा मंदिर उद्ध्वस्त न करता सरकारला प्रकल्प उभारायचा असेल तर उभारा. तसेच येथील ग्रामस्थ जो निर्णय घेतील त्याला मी खासदार म्हणून बांधिल असणार आहे. येथील ग्रामस्थांची घरेदारे उद्ध्वस्त करून आम्हाला गावचा विकास साधायचा नाही. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचविण्याचा तसेच येथील साधनसंपत्तीचा योग्य उपयोग करून आम्हाला गावचा विकास करावयाचा आहे, असेही खासदार राऊत म्हणाले. यावेळी ग्रामस्थांनी गावातील समस्यांबाबत राऊत यांच्याकडे निवेदन सादर केले. तोंडवळी- तळाशील भागातून जाणारा रस्ता शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. यामुळे हा रस्ता दुरूस्त करण्यात अडचणी येत आहेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, तालुकाप्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उदय दुखंडे, अरूण कांबळी, शेखर तोडवळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘सी-वर्ल्ड’च्या नावाखाली स्वत:चे
By admin | Updated: June 23, 2014 01:37 IST