दापोली : दापोलीचे नायब तहसीलदार नाथाजी सगट (वय ३८) आणि डाटा आॅपरेटर नितीन शिर्के यांना १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज, सोमवारी रंगेहात पकडले. चिरेखाणीच्या वाढीव उत्खननाचा दंड मागे घेण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. या कारवाईमुळे महसूल कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.दापोली तालुक्यातील उर्फी बौद्धवाडी येथील रूपेश जाधव यांच्या चिरेखाणीवर वाढीव उत्खननाची आठ हजार ९०० रुपयांची दंडात्मक कारवाईची नोटीस बजाविण्यात आली होती. दंडात्मक कारवाई मागे घेण्यासाठी निवासी नायब तहसीलदार नाथाजी सगट यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. नायब तहसीलदार सगट यांच्याविरोधात रूपेश जाधव यांनी शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विराग पारकर, पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, पोलीस हवालदार हरसकर, वीर, सुतार, भागवत यांनी सापळा रचला.लाचलुचपत विभागाचे अधिकारी दापोली तहसील कार्यालयात सापळा रचून बसले होते. सायंकाळी ५.२० च्या सुमारास रूपेश जाधव १५ हजार रुपये घेऊन कार्यालयात गेले असता निवासी नायब तहसीलदार सगट यांनी १५ हजार रुपये डाटा आॅपरेटर नितीन शिर्के यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यावरून त्यांनी १५ हजार रुपये घेतले असता डाटा आॅपरेटर शिर्के यांना रंगेहात पकडण्यात आले.दंडात्मक कारवाई न करण्यासाठी घेण्यात आलेली रक्कम सगट यांच्या सांगण्यावरून घेतल्याची जबानी शिर्के यांनी दिली आहे. त्यामुळे दोघांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून उद्या, मंगळवारी या दोघांनाही खेड न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
नायब तहसीलदारांना लाच घेताना पकडले
By admin | Updated: December 29, 2014 23:49 IST