तळवडे : माझी लढाई शांततेसाठी व समृद्धीसाठी आहे. मी ज्येष्ठ नसलो तरी येथील सर्वसामान्यांचा नेता आहे. येथील नागरिकांना प्र्रेम, शांतता हवी असून ते दहशतीच्याविरोधात आहेत. सावंतवाडी संस्थान सुसंस्कृतांचे असून ते अन्याय सहन करणार नाहीत. दहशतवादाविरोधातील माझी लढाई पावित्र्याची आणि लोकांसाठीच आहे, असे मत शिवसेनेचे विधानसभा उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. तळवडे- बाजारपेठ येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी भाई गोवेकर, सुरेश नाईक, रुपेश राऊळ, प्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत, मंगेश तळवणेकर, रमाकांत मल्हार, विभागप्रमुख विनोद काजरेकर, आ. रा. सावंत, राजू नाईक , स्मिता सोनावणे, प्रशांत बुगडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, सावंतवाडी मतदारसंघात बाहेरुन काही पार्सले आली आहेत. त्यांना चेंडूप्रमाणे उडवून सुखरूप परत पाठवा. ही गुंड संस्कृती जिल्ह्याबाहेर काढणे जिंल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. विरोधकांनी विकासकामांमध्ये सदैव खो घालण्याचे काम केले. जनतेवर गुंड प्रवृत्तीने अन्याय केला आहे. अशा विरोधकांना परतीची तिकिटे काढून द्या. सावंतवाडीत आलेल्या बाहेरील उमेदवारांना धडा शिकवा. त्याचा सावंतवाडीतील शिरकाव होण्यामागे खूप मोठे राजकारण आहे. केवळ स्थार्थासाठीच त्यांनी सावंतवाडीत तळ ठोकला आहे. शिवसेनेचे हात सदैव असेच बळकट करत रहा, असे आवाहन यावेळी दीपक केसरकर यांनी केले. येथील जनतेने भूलथापांना बळी पडता कामा नये, जनतेचा विकास कोण करु शकतो याची जनतेला जाणीव आहे. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही विकासाच्या पाठिशी जनता नेहमीच उभी राहते, हे दाखवून द्या. सावंतवाडी मतदारसंघात वाढणारा दहशतवाद, गुंडागर्दी हद्दपार करा, अन्यथा तुमचे, आमचे संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही जान्हवी सावंत यांनी यावेळी दिला. (प्रतिनिधी)
शांतता, समृद्धीसाठीच माझी लढाई
By admin | Updated: October 12, 2014 23:34 IST