सिंधुदुर्गनगरी : सांसद आदर्श ग्राम योजनेतून सन २०१४-१५मध्ये ६ कोटींपर्यंत विकासकामे करण्यात येणार असून, ग्रामस्थ व प्रशासनाच्या सहकार्याने आपले गाव आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करावा. प्रशासन व ग्रामस्थ यामधील संवाद वाढवून गावामध्ये विकास योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.मिठबाव येथे सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांची माहिती देण्यासाठी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना मुणगेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, पंचायत समिती सभापती महेश सारंग, सरपंच रेखा जेठये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, देवगड गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांसह सर्व शासकीय यंत्रणांचे खाते प्रमुख, ग्रामस्थ उपस्थित होते.मिठबाव बाजाराकरिता १० लाख रूपयांच्या निधीतून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये रस्त्यांची डागडुजी करणे, स्वच्छतागृह उभारणे, निवारे उभारणे ही कामे घेण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून ही कामे लवकरात लवकर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी सांसद आदर्श ग्राममध्ये उत्कृष्ट काम करून मिठबांव फक्त राज्यातच नव्हे; तर देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न करावा.यावेळी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांच्या अखत्यारीतील पूर्ण केलेली कामे आणि नव्याने करण्यात येणाऱ्या कामांची संपूर्ण माहिती यावेळी दिली. तसेच ग्रामस्थांची याव्यतिरिक्त साकव अथवा रस्त्यांच्या कामांची मागणी असल्यास त्यावरही कार्यवाही करून प्रस्ताव सादर करण्यात येतील व काम पूर्ण करून घेण्याची तयारी असल्याचे कार्यकारी अभियंता छाया नाईक यांनी यावेळी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर यांनी मिठबाव ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी ९ लाख रूपयांचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. निर्मल भारत अभियानअंतर्गत ३५ कुटुंबाकडे अद्याप शौचालय होणे बाकी आहे. या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून लाभ घेता येऊ शकतो. तसेच सार्वजनिक शौचालयाची मागणी केल्यास १० लाख रूपयांचा निधी या गावाला देता येईल, अशी माहिती सादर केली. जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांनी, जिल्हा नियोजनमधून गावात करता येणारी कामे पर्यटनामधून गावाला विकास करण्यासाठी वाव आहे, याबाबत थोडक्यात माहिती दिली. प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. स्वागत सरपंच रेखा जेठये यांनी केले. (प्रतिनिधी)१ कोटी ८९ लाखांची कामे प्रस्तावित : मुणगेकरमुणगेकर म्हणाले, मिठबाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत १ कोटी ८९ लाख रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. ग्रामस्थांनी ही योजना पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. ज्या गावातून पाईपलाईन येणार आहे त्या गावांनाही विश्वासात घेऊन पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे. ज्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शनाची गरज लागल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामंजस्याने मार्ग काढून विकासकामे गुणवत्तापूर्वक होण्यासाठी स्वत: लक्ष घालून प्रयत्न करावा. तसेच माझ्या कालावधीतच मिठबाब गावचे व बाजारपेठेचे कामही पूर्ण करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे.चालू आर्थिक वर्षात ६ कोटींची तरतूद : ई. रवींद्रनजिल्हाधिकारी ई. रवींद्रन म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मिठबांव गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त योजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात फक्त ६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापुढे जाऊन गावाची काही मागणी असल्यास तीही प्रस्तावित करण्यात येईल. गावाचा विकास करण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची मानसिकता ठेवावी असेही रवींद्रन यांनी स्पष्ट केले.मिठबाव बाजाराचा १० लाखांच्या निधीतून विकास केला जाणार.मिठबाव राज्यातच नव्हे तर देशात प्रथम क्रमांकावर आणण्याचे प्रयत्न.रस्त्यांची डागडुजी, स्वच्छतागृहांची उभारणी होणार.साकव रस्त्यांच्या कामासाठीही प्रस्ताव तयार करणार.गावातील ३५ कुटुंबाकडे अद्यापही शौचालय नाही.पर्यटनाद्वारे गावात विकासाची कामे होणार.सार्वजनिक शौचालयांसाठी मागणी केल्यास १० लाखांचा निधी उपलब्ध होणार.विकास कामांवर भर.जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्या : पांढरपट्टेमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे म्हणाले, आदर्श गाव करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन पांढरपट्टे यांनी केले.
मिठबाव होणार आदर्श ग्राम : मुणगेकर
By admin | Updated: May 29, 2015 23:48 IST