कणकवली : एसटी वाहतुकीचे खासगीकरण करू नये, राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या कोकणातील पश्चिम किनारी सागरी महामार्गाचे काम सर्व पुलांसह पूर्ण करावे, या कोकण विकास आघाडीच्या आठ कलमी कार्यक्रमानुसार केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोकणच्या विकासाचे नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास आघाडीचे सिंधुदुर्ग संघटक गणपत चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले.चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना मृत्यूचा सापळा ठरलेल्या कशेडी घाटाऐवजी खेडजवळ दिवाणखवटी येथे बोगदा खोदावा, कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, कोकण किनाऱ्यावर बोट वाहतूक सुरू करावी, पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून पाणी साठवणूक करावी, कोकणातील लघु उद्योजकांच्या समस्या दूर कराव्यात, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव द्यावा, अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा सामाजिक संस्था फेडरेशन आणि गोपुरी आश्रमाच्यावतीने आयोजित जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या मेळाव्यात हे निवेदन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना देण्यात आले. या निवेदनासोबत कोकण विकास आघाडीच्या ३६व्या वर्धापन दिनानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या विकासांच्या आठ कलमी कार्यक्रमाच्या ठरावाची प्रत या निवेदनासोबत देण्यात आली आहे. सामाजिक संस्थांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या प्रभू यांच्या वक्तृत्वामुळे या निवेदनाबाबत सकारात्मक पावले नक्कीच उचलतील, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
कोकणच्या विकासाचे मंत्र्यांनी नियोजन करावे
By admin | Updated: January 15, 2015 23:24 IST