सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत योग्य निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहील आणि गुरूवारपासून या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनास दिला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांची फसवणूक केली आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत जिल्ह्यातील १२७ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी १ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आज दुसऱ्या दिवशी जिल्हा रूग्णालयासमोर बसून निदर्शने केली. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. शासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात, त्याची पूर्तता कोण करणार? आणि आम्ही वाट तरी किती वर्षे पाहायची? डॉक्टरांची मानसिकता बिघडविण्याचे काम शासनाकडून सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता होत नसेल तर त्यांची काम करण्याची मानसिकता कशी राहील? त्यांनाच स्थिर केले नाही तर दर्जेदार सेवा कशी मिळणार? जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा नसतानाही आम्ही इथे स्थिरावू पाहत आहोत. रूग्णांची सेवा करायची आहे. आम्हाला सुखाने नांदू देत नाहीत. मग या जिल्ह्यात डॉक्टर कोण येणार? असा प्रश्नही डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.कामबंद आंदोलनात जिल्हा रूग्णालय, सर्व ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शालेय आरोग्य तपासणी करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूणच आरोग्य यंत्रणा कुचकामी बनली आहे. मात्र, जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून रूग्णालये सुरू ठेवण्याचा केविलवाणा अयशस्वी प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात ५० टक्केहून जादा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे जिल्हाभरातून आरोग्य सेवेबाबत अनेक तक्रारी येत आहेत. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करीत २४ तास सेवा बजावावी लागत आहे. असे असताना आता सर्वच १२७ प्रमुख वैद्यकीय अधिकारी कामबंद आंदोलनात सहभागी झाल्याने आरोग्य सेवा कोण देणार? जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून केवळ कामचलावू सेवा पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रूग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. शासकीय रूग्णालयांमधील रूग्णांची संख्या रोडावली आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन होणार तीव्र
By admin | Updated: July 3, 2014 00:25 IST