रत्नागिरी : जिल्हा रुग्णालय व दोन खासगी रुग्णालयांची मिळून ५०० खाटांची संख्या पूर्ण होत असल्याने रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्राथमिक निर्णय झाला आहे. याबाबत येत्या २९ जुलै २०१४ला सर्व संबंधितांची बैठक आपण मुंबईत घेणार असून, त्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादनमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला पालकमंत्री तथा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., डॉ. रमेश चव्हाण, डॉ. अलिमियॉँ परकार व डॉ. संजीव पावसकर उपस्थित होते. जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, आता आघाडी सरकारच्या या सत्तेतील अवघे दोन ते तीन महिनेच बाकी राहिले आहेत, असे असताना हा निर्णय घेतल्यास त्याची पुढील सरकारकडून पूर्तता होईल काय, या पत्रकारांच्या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, सरकारचा निर्णय पुढील सरकार बदलत नाही. आमचेच सरकार येणार याची खात्री बाळगा. जून २०१५ मध्ये हे महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होणे शक्य आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी २५ एकर जमिनीची अट आहे; परंतु डोंगरी जिल्हा म्हणून रत्नागिरीला १० एकर जागाही चालेल. अर्थात २५ एकर जागेचीही येथे उपलब्धता आहे. ५०० खाटांची दुुसरी अटही जिल्हा रुग्णालय, परकार व चिरायू हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. पूर्ण वैद्यकीय महाविद्यालय उभारायला वेळ लागेल. त्यामुळे प्रथम खासगी रुग्णालयांच्या मदतीने वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे सोपे ठरेल. त्याबाबत चिरायुचे डॉ. चव्हाण व परकार हॉस्पिटलचे डॉ. परकार यांच्याशी आपण चर्चा केली असून, त्यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आहे, असे सांगत आव्हाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)जितेंद्र आव्हाड म्हणाले.....- नरेंद्र मोदींनी केलेल्या मार्केटिंगचे कौतुक करायला हवे. नसलेल्या गोष्टींचेही चांगले मार्केटिंग केले. त्याचे परिणाम महागाईच्या रूपाने जनतेला भोेगावे लागत आहेत. - विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसने राष्ट्रवादीला सन्मानाने वाढीव जागा द्याव्यात.- दीपक केसरकरांची मी सावंतवाडीच्या चौकात पाया पडून माफी मागेन..- फलोत्पादनाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या धोरणाचे चांगले परिणाम राज्यात दिसत आहेत.भांडणे मिटवा...आंबा नुकसान भरपाईचे ५३ कोटी परत जाणार होते; परंतु ते थांबविले. त्यामुळे येथील भावा-भावांतील भांडणे मिटवावीत. हे पैसे ज्यांचे नुकसान झाले, त्यांच्या घरांत जावेत, हा सरकारचा प्रामाणिक हेतू आहे.
रत्नागिरीत होणार वैद्यकीय महाविद्यालय
By admin | Updated: July 21, 2014 23:41 IST