बांदा : मुंबई- गोवा महामार्गावर इन्सुली खामदेव नाका येथे डंपर व कार यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील दाम्पत्य गंभीररित्या जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने त्या दोघांनाही तत्काळ गोवा बांबोळी येथे उपचारासाठी हलविण्यात आले. हा अपघात आज गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातात कारमधील प्रवीण कुमार वैद्य (३२) व त्यांची पत्नी अंशुमाला प्रवीण वैद्य (२६) दोघे रा. पणजी- गोवा हे जखमी झाले आहेत. स्थानिकांनी जखमींना सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले. महामार्गावर डंपर (जीए 0१ यु ३0३६) कुडाळ येथून दोडामार्ग येथे वाळूची वाहतूक करत होता. त्याचवेळी बांद्याहून आंबोलीच्या दिशेने जाणारी कार (जीए 0१ एन ५१२९) इन्सुली खामदेव नाका येथून सावंतवाडीच्या दिशेने वळण घेत होती. त्याचवेळी महामार्गावरुन सुसाट वेगात येणार्या डंपरने कारला जोरदार धडक देत सुमारे ५0 ते १00 फूट फरफटत नेले. या अपघातात कारच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला. कारच्या डाव्या बाजूला बसलेल्या अंशुमाला वैद्य यांना गंभीर दुखापत झाली. (प्रतिनिधी)
कार-डंपर अपघातात दाम्पत्य जखमी
By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST