कणकवली : साखळी पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या एका कंपनीचे सेमिनार सुरू असताना काहींनी कंपनीच्या प्रतिनिधींना मारहाण केली. रविवारी सकाळी येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. लाखो रूपये कमवण्याचे आमिष दाखवत कंपनीकडून तालुक्यातील युवक-युवतींची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला. पोलीस स्थानकात सर्वजण दाखल झाल्यानंतर तालुक्यातील ग्राहकांचे ६० टक्के पैसे परत करण्याचा तोडगा काढण्यात आला. मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीचे कुडाळ येथे शाखा कार्यालय आहे. या कंपनीचे व्यवसाय वृद्धीसंदर्भातील सेमिनार येथील हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. कंपनीच्या सहा-सात प्रतिनिधींसह शंभराहून अधिक युवक-युवती या सेमिनारला उपस्थित होते. त्याचवेळी युवक कॉँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे उपस्थित झाले. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींशी बाचाबाची होऊन एकाला मारहाण करण्यात आली. काही कालावधीने तेथे पोलीस उपस्थित झाले आणि सर्वांना पोलीस स्थानकात नेण्यात आले. या कंपनीतर्फे पाच ते सात हजार रूपये गुंतवून ग्राहकांना काही प्रॉडक्ट देण्यात येतात. प्रॉडक्ट विक्री आणि चेन मार्केटिंगमधून लाखो रूपये कमवा अशा प्रकारे जाहिरात करत कंपनी सदस्य बनवले जातात. मोबाईल, एनर्जी सेव्हर आदी प्रॉडक्ट सदस्यांना दिले जातात. आठवड्याला एक लाख तीस हजार रूपयांपर्यंत कमविण्याची संधी असून अनेक जणांनी असे पैसे कमावल्याचे व्याख्यानातून सांगण्यात येत होते. मात्र, या साखळी व्यवसायात मागील वर्षी तालुक्यातील काही युवक युवतींनी पैसे गुंतवले होते. त्यांनी कमिशन न मिळणे तसेच खराब प्रॉडक्ट मिळणे अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. कणकवलीत सेमिनार असल्याची माहिती मिळताच या युवक-युवतींसोबत युवक कॉँग्रेसचे पदाधिकारी सेमिनारस्थळी गेले. युवकांनी प्रतिनिधींचे व्याख्यान थांबवत आपली फसवणूक कशी झाली याबद्दल सांगितले. तेव्हा व्यासपीठावर बाचाबाची झाली. तणाव वाढून कंपनी प्रतिनिधींना मारहाण झाली. तेवढ्यात तेथे उपस्थित झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविकांत अडुळकर, उत्तम पांढरे यांनी सेमिनार थांबवत चौकशी केली. उपस्थितांची नावे लिहून घेत सर्वांना कणकवली पोलीस स्थानकात पाचारण करण्यात आले. चर्चेअंती तालुक्यातील कंपनीचे ग्राहक असलेल्या युवक-युवतींकडून घेतलेल्या रकमेपैकी ६० टक्के रक्कम परत करण्याचा तोडगा काढण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस स्थानकात याप्रकरणी कोणतीही तक्रार देण्यात आलेली नव्हती. संदीप मेस्त्री यांच्यासह मिलिंद मेस्त्री, गणेश तळगांवकर, वासीम फकीर, मनोज जाधव, चानी जाधव, परेश आचरेकर, आनंद तळवडेकर, प्रथमेश मठकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)आशिये व कलमठ परिसरातील युवकांचे कंपनीने पैसे घेतले. सुमारे पंचवीस युवकांची फसवणूक झाली. मात्र, कंपनीकडून आता त्यांचा फोन उचलला जात नाही. त्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला. कंपनीकडून १ लाख २०० रूपये युवकांचे परत करण्यात आले असून यापुढे कंपनीला कणकवलीत काम करू देणार नाही.- संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस, कणकवली
मार्केटिंगच्या प्रतिनिधींना मारहाण
By admin | Updated: July 20, 2015 00:06 IST